• Mon. Nov 25th, 2024
    शहीद जवान जयसिंग भगत अनंतात विलीन

    शहीद जयसिंग भगत यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

    सांगली दि. २१ (जि.मा.का.) : सियाचीन येथे सैन्य दलात सेवा बजावत असताना सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (शनिवार) खानापूर येथे सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी तर चिफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्या वतीने सुभेदार मेजर समीर नालबंद यांनी शहीद जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

    खानापूर ते गोरेवाडी रस्त्यावरील भगत मळा येथे शहीद जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैनिकी व पोलीस जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. यावेळी उपस्थित सर्वांनी साश्रू नयनांनी शहीद जयसिंग भगत यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, नगराध्यक्ष डॉ.उदयसिंह हजारे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  विजया पांगारकर, विटा उपविभागीय अधिकारी संतोष भोर, तहसिलदार ऋषिकेश शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, माजी आमदार सदाशिव पाटील तसेच खानापूर परिसरातील मान्यवर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत हे सियाचीन ग्लेशियर येथील फॉरवर्ड पोस्टवर युद्धजन्य परिस्थितीत तैनात असताना अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे त्यांना १५ जानेवारी रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून कमांड हॉस्पिटल चंदीगड येथे विशेष हेलिकॉप्टरने आणण्यात आले होते. परंतु त्यांची  २० जानेवारी रोजी प्राणज्योत मावळली. त्यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात आले व पुढे ॲम्बुलन्सने त्यांच्या गावी खानापूर येथे आज २१ जानेवारी रोजी आणण्यात आले. खानापूर येथे शहिद जयसिंग भगत यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवून खानापूर शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली व सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अमर रहे…. अमर रहे ….. शहिद जयसिंग भगत अमर रहे … या घोषणांनी खानापूर शहर दुमदुमून गेले. अंत्यसंस्कारासाठी मराठा इन्फट्री सेंटर बेळगाव येथून सुभेदार मेजर समीर नालबंद व १५ सैनिक आले होते. शहिद जयसिंग भगत यांच्या पश्चात पत्नी रूपाली, तीन मुली, एक मुलगा, वडील असे कुटुंबीय आहे.

    शहिद जयसिंग भगत यांच्या कुटुंबाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांत्वन

    जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शहिद जवान जयसिंग भगत यांच्या कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले व धीर दिला.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed