• Mon. Nov 25th, 2024

    सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 13, 2023
    सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

    सोलापूर, दि. 13 (जि. मा. का.) : सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाला आपले सर्वोच्च प्राधान्य असून, सोलापूर जिल्ह्याची ब्रँड व्हॅल्यू निर्माण करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करू. जिल्ह्याची बलस्थाने शोधून उद्योग, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, पर्यटन, महिला बचत गट अशा सर्वच क्षेत्रातील विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.

    जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन भवन सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आणि ओमराजे निंबाळकर, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, बबनराव शिंदे, संजयमामा शिंदे, यशवंत माने, श्रीमती प्रणिती शिंदे, रणजीतसिंह मोहिते पाटील, यांच्यासह जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त शीतल उगले, प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हिंमत जाधव, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे आदिंसह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

    जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी विकास आराखडा तयार करावा. विकासात्मक भूमिका घेऊन लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2022-23 मध्ये खर्चाच्या टक्केवारीच्या बाबतीत जिल्हा नियोजन समिती राज्यात अग्रेसर आहे. मात्र, स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर निधी खर्च होण्यास अत्यल्प वेळ मिळणार आहे. तरी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी चालू वित्तीय वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेचा निधी विहित वेळेत खर्च करण्यास प्राधान्य द्यावे. 100 टक्के निधी मार्च 2023 पूर्वी खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

    जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 करिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी रू. 502.95 कोटी रुपये,, अनुसूचित जाती उपयोजनासाठी रू. 151 कोटी रुपये आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनासाठी रू. 4.28 कोटी  असा एकूण 658.23 कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रारूप आराखड्यास राज्यस्तरीय समितीसमोर सादर करण्यास समितीने मान्यता दिली. तसेच, उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सादर करण्याच्या अनुषंगाने 166 कोटी रुपयांच्या अतिरीक्त मागण्यांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये आणखी निधी वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिली.

    महिला बचत गटांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग व मार्केटिंग होण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात आयटी पार्क होण्याच्या दृष्टीने पावले उचलू. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून, तसेच, प्राचार्य, उद्योजक व अन्य क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून असणाऱ्या अपेक्षा मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. जिल्ह्यात रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील, अशा पद्धतीने नियोजन करावे, असे ते म्हणाले.

    विकासाचे निर्णय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन घ्यावेत, तसेच, खातेप्रमुखांनी कोणत्याही दबावाखाली काम करू नये. चांगले व पारदर्शकतेने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आपण नेहमीच पाठीशी राहू, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली. जलजीवन मिशनची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका. ज्यांच्याकडून दोन कामे अपूर्ण असतील, त्यांना पुढील कामे देऊ नयेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करू. जिल्हा परिषद शाळा बीओटी तत्त्वावर देण्याचा मनोदय व्यक्त करून ज्या जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरीत होणार आहेत, त्यांचे महानगरपालिकेने सक्षमीकरण करावे, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, जी 20 देशातील उद्या पुण्यात येणाऱ्या शिष्टमंडळास सोलापुरी चादर व टॉवेल देणार असल्याचे सांगून 22 देशांतील सदस्यांपर्यंत या माध्यमातून सोलापूरच्या उत्पादनांचे ब्रँडिंग होईल, असे ते म्हणाले.

    या बैठकीत 04 ऑक्टोबर 2022 रोजी  झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्तास तसेच  बैठकीचे इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाही अनुपालन अहवालास मान्यता देण्यात आली. सन 2022-2023 अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना यांच्या 31 डिसेंबर 2022 अखेरील  खर्चाचा यंत्रणानिहाय व योजनानिहाय आढावा  घेण्यात आला.

    प्रारंभी जिल्हा नियोजन समितीवर नवनियुक्त सदस्यांचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पुंडलिक गोडसे यांनी सादरीकरण केले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व नियोजन समिती सदस्यांनी मते मांडली. बैठकीस विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख,नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *