सातारा दि. 13: विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. आश्रमशाळांमधील ५ वी ते ८ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते टॅबचे वितरण करण्यात आले आहे.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, सहायक आयुक्त, समाज कल्याण नितीन उबाळे आदी उपस्थित होते.
वितरित करण्यात आलेल्या टॅबचा दर्जेदार शिक्षण देण्यासाठी निश्चितच चांगल्या प्रकारे उपयोग होईल असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगती होते. या शैक्षणिक प्रगतीसाठी शासन कटीबध्द असून विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात येत आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत जिल्हयातील विजाभज आश्रमशाळांमधील इ. 5 वी ते 10 वी च्या प्रवेशित विद्यार्थ्यांना एकूण 1673 टॅब उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कोरोना काळात शाळा व आश्रमशाळा बंद झाल्याने ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरु होते परंतु विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने विद्यार्थ्यांना ते संगणक/मोबाईल उपलब्ध करुन देऊ शकत नाहीत. त्यामुळे शासनाने 9वी ते 12 वी मधील विद्यार्थ्यांना टॅब उलब्ध करुन दिले आहेत. आता विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळेतील 5 वी ते 8 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही टॅब उपलब्ध करुन दिले आहेत.
0000