मुंबई दि. १३ ; मराठी भाषा संवर्धन पंधरवडा राज्यभर साजरा करावा, अशा सूचना मराठी भाषा विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खासगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये इ. संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो.
मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या विभागाच्या मुख्य धोरणास अनुसरुन ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात येतात. त्यानुसार यावर्षीदेखील मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये आयोजित करण्यासाठी मराठी भाषा विभागाने सर्व कार्यालयांना सूचना दिल्या आहेत.