• Sat. Sep 21st, 2024

सेवासदन संस्थेचे कार्य पथदर्शी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ByMH LIVE NEWS

Jan 2, 2023
सेवासदन संस्थेचे कार्य पथदर्शी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि. 2 : सेवासदन संस्थेने महिलांच्या शिक्षणासह संस्कारक्षम शिक्षणात अमूल्य योगदान देत पथदर्शी कार्य केले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी आज येथे या संस्थेच्या 96 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात  काढले. त्यांच्या हस्ते अकोला येथील एन्करेज एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेला रमाबाई रानडे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सेवासदन संस्थेच्या डॉ. वसंतराव वांकर स्मृती  रंगमंचावरआयोजित या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, लेखक यशवंत कानेटकर, अनिरुद्ध देशपांडे,सेवासदन संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी उपस्थित होत्या.

राज्यपाल पुढे म्हणाले, सेवा हाच परमधर्म मानून १९२७ पासून  सेवासदन संस्थेचे कार्य नागपूर शहरात  सुरु आहे. या संस्थेने  संस्थापक रमाबाई रानडे यांचे महिला सक्षमीकरणाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. संस्कारक्षम  शिक्षणाचा नवा वस्तुपाठच या संस्थेने घालून दिला आहे. या  कार्याचा विस्तार होत असताना अन्य शैक्षणिक संस्थांनाही  हे कार्य मार्गदर्शक ठरणार आहे. पर्यायाने  शिक्षण  क्षेत्रात सेवासदनचे  मोठे योगदान ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘एन्करेज एज्युकेशन फाऊंडेशन’ला रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार

अकोला येथील ‘एन्करेज एज्युकेशन फाऊंडेशन’ला  राज्यपालांच्या हस्ते या कार्यक्रमात रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्ष प्रांजली  जयस्वाल आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा  पुरस्कार स्वीकारला.

रमाबाई  रानडे  यांच्या स्मृती  प्रित्यर्थ  दरवर्षी २ जानेवारीला  सेवासदन संस्थेच्यावतीने  नि:स्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाना हा मानाचा पुरस्कार  प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे हे ८वे वर्ष आहे. ५१ हजारांचा धनादेश व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार प्राप्त एन्करेज एज्युकेशन फाऊंडेशनने  अकोला जिल्ह्यातील अनाथ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्वपूर्ण कार्य केले. जिल्ह्यातील आठ वस्तींमध्ये  संस्थेतर्फे संस्कार व अभ्यासवर्ग चालविण्यात येतात. व्यसनमुक्ती  पुनर्वसन आणि समुपदेशनाचे कार्यही केले जाते. चाइल्ड हेल्प लाईनच्या माध्यमातून संस्थेने १६४ बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत  सुखरूप पोहचवले आहे.

कांचन गडकरी यांनी  प्रास्ताविक केले.यशवंत कानेटकर व अनिरुद्ध देशपांडे यांनी  मार्गदर्शन केले.                                         ०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed