जळगाव दि. २१ (जिमाका) : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यात जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२३-२४ यासाठी तब्बल ५६९ कोटी ८० लाख रूपयांची तरतूद असणाऱ्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. नियोजनाच्या राज्यस्तरीय बैठकीत आपण जिल्हा विकासासाठी अतिरिक्त १०० ते १५० कोटी रूपयांची अतिरिक्त तरतूद करणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिली. सन २०२२-२३ च्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मंजूरी दिली असून या बैठकीत चालू वर्षातील ५९९ कोटी रूपयांच्या खर्चाचा आढावा देखील घेण्यात आला.
नियोजन समितीच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार सर्वश्री एकनाथ खडसे, संजय सावकारे, चिमणराव पाटील, सुरेश भोळे, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, मंगेश चव्हाण, लता सोनवणे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा नियोजन अधिकारी प्रताप पाटील आणि विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्ह्याचा विकास करताना शेतकरी केंद्रबिंदू मानून तसेच सामान्य माणसांची बांधिलकी ठेऊन विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे. निधी अभावी रखडलेल्या प्रकल्पांना चालना देऊन प्रलंबित व नव्याने सुचाविलेली कामे मार्गी लावण्यासाठी कटीबद्ध आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य आणि आत्मियतेने काम करावे, असे आवाहन करून कामे दर्जेदार व विहीत मुदतीत पूर्ण करून प्रशासकीय दिरंगाई व कामाच्या गुणवत्तेतील चालढकल खपवून घेतली जाणार नाही.
५७ कोटी २४ लक्षच्या ९५७ ट्रान्सफार्मर व अनुषंगिक कामांचे लोकार्पण
जिल्ह्यात शेती व गावठाण भागासाठी ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) साठी डीपीडीसी तरतूद करुन ५७ कोटी २४ लक्ष ८२ हजार रुपयांचा निधी खर्च करून ९५७ ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) बसविण्यात आलेल्या रोहीत्रांचे व अनुषंगिक कामांचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सन २०२३ – २४ साठी ५६९ कोटी ८० लाखाच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण SCP/TSP -OTSP) ठळक बाबी
बैठकीत सन २०२३-२४ च्या जिल्हा वार्षिक योजना प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यात सर्वसाधारण योजनांच्या अंतर्गत ४३२ कोटी २९ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजना म्हणजेच एससीपीच्या अंतर्गत या आराखड्यात ९१ कोटी ५९ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र म्हणजेच टिएसपी-ओटीएसपीच्या अंतर्गत या आराखड्यात ४५ कोटी ९२ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. सन २०२३-२४ च्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण SCP/TSP -OTSP) च्या रु. ५६९ कोटी ८० लाखाच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. शासकीय कार्यान्विन यंत्रणांकडून एकूण मागणी ६०८ कोटी ५७ लक्ष इतकी होती.
सन २०२३-२४ पुनर्विनियोजन प्रस्तावाला मान्यता
या बैठकीत सन २०२२ – २३ च्या चालू वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजना पुनर्विनियोजन प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. यात सर्वसाधारण योजनेतील शिक्षण, तंत्रशिक्षण, ग्रंथालय, आरोग्य , कौशल्य विकास, सहकार, पर्यटन, रेशीम, कृषी, लपा भूसंपादन इत्यादी योजनांमध्ये रु. ३६ कोटी ५५ लाख २८ हजार इतकी बचत प्राप्त झाली असून त्या बचतीचे लम्पी आजार, लपा योजना, CMGSY, विद्युत, शासकीय इमारती (नियोजन भवन दुरुस्ती) मृद व जलसंधारण, पोलीस वाहने याकरीता पुनर्विनियोजन करण्यात येईल.
पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले निर्देश !
या बैठकीत खासदार, आमदार व नियोजन समितीच्या सदस्यांनी या महिनाअखेर पर्यंत कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले. सर्व यंत्रणांनी निधीचा पूर्ण विनीयोग करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. प्रशासकीय मान्यता, वर्क ऑर्डर आदी प्रक्रिया तात्काळ पार पाडण्याचेही त्यांनी सांगितले. १०० % निधी खर्च होण्याबाबत प्रशासनाने सज्ज राहण्याचे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्या शासकीय यंत्रणांना सूचना
यावेळी जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी विविध लेखशीर्ष निहाय माहितीचा आढावा सादर केला. प्रशासकीय विभागांना जिल्हा नियोजन समितीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचे नियोजन करून मार्च २३ अखेर प्राप्त सर्व निधीचा खर्च परिपूर्ण होईल तसेच निधीचा वापर हा अनुषंगिक कामांसाठी होईल. तसेच गुणवत्तापूर्वक कामे होतील याकडे विभाग प्रमुखांनी व्यक्तिशः लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.