मुंबई -प्रतिनिधी
जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाच्या निमित्ताने मुलांमध्ये आपत्ती निवारण उपाययोजनांविषयी जागरुकता निर्माण व्हावी, त्या अनुषंगाने त्यांनी याविषयी विचार करावा, विविध माध्यमांतून माहिती संकलीत करावी व आपल्या ज्ञानाची आणि संकल्पनांची मांडणी करावी यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने नमुंमपा शालेय स्तरावर चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
नमुंमपा शाळांमधील इयत्ता 5 वी ते 8 वी या प्राथमिक स्तरावर घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामधून नमुंमपा शाळा क्र. 33 पावणे ची विद्यार्थिनी सिरजना रमेश सिंह हिने प्रथम तसेच नमुंमपा शाळा क्र. 48 दिवा ची विद्यार्थिनी मयुरी मच्छिंद्र मढवी हिने व्दितीय आणि नमुंमपा शाळा क्र. 35 ची विद्यार्थिनी श्रेया संतोष करंदकर हिने तृतीय क्रमांकाचा बहुमान पटकाविला. नमुंमपा शाळा क्र. 72 कोपरखैरणेचा विद्यार्थी विकास दिलीप पाल यास उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
इयत्ता 9 वी व 10 वी या माध्यमिक स्तरावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत नमुंमपा शाळा क्र. 103 ऐरोली येथील विद्यार्थिनी हर्षदा मोहन हारुगडे ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. नमुंमपा शाळा क्र. 111 तुर्भेस्टोअर येथील विद्यार्थिनी शिवानी विठ्ठल पवार व्दितीय तसेच नमुंमपा शाळा क्र. 121 कुकशेत चा विद्यार्थी निखिल तिवारी तृतीय क्रमांकाचा विजेता ठरला. गायत्री दत्ताराम देवळेकर या नमुंमपा शाळा क्र. 101 शिरवणे या विद्यार्थिनीस उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते विष्णुदास भावे नाट्यगृहात बालदिनी संपन्न झालेल्या स्वच्छ बाल महोत्सवाप्रसंगी चित्रकला व निबंध स्पर्धेत सहभागी गुणवतं विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.