मुंबई, दि. 14 : लम्पी रोगाच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेता रोगावर नियंत्रण मिळवण्याकरीता प्रभावीपणे उपाययोजनांबाबत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या तज्ज्ञ पथकाने संशोधन करावे, तसेच राज्यामध्ये लम्पी चर्मरोगाच्या सद्यस्थितीवर केंद्रीय संशोधन संस्थांकडून मार्गदर्शन घेण्यात यावे असे निर्देश महसूल ,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांनी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव आयुक्त पशुसंवर्धन सचिंद्र प्रताप सिंह अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन व संचालक (विस्तार शिक्षण) महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ तथा राज्यस्तरीय कार्यदलाचे सभासद व लम्पी चर्मरोग तज्ज्ञ यांच्या समवेत बुलढाणा, जळगांव, अमरावती, अकोला, अहमदनगर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर आणि सांगली या लम्पी चर्मरोगाचा जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या 10 जिल्ह्यांमधिल जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीमध्ये रोगपरिस्थितीचा आढावा घेतला.
जास्त प्रार्दुभाव असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरणाला प्राधान्य द्यावे. गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांना जबाबदारी सोपवावी. रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी करण्यात येणाऱ्या प्रत्येक बाबींवर गांभीर्याने लक्ष ठेवावे.
पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भावास कारणीभूत असल्याचे मत राज्यस्तरीय कार्यदलाने व्यक्त केले असल्यामुळे आयुक्त पशुसंवर्धन, यांनी या दोन्ही पद्धती लम्पी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यामध्ये १४ नोव्हेंबर २०२२ अखेरची माहिती
राज्यातील 34 जिल्ह्यांमधील एकूण 3 हजार 551 संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 246065 बाधित पशुधनापैकी एकूण 173841 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी 16 हजार 405 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 5 हजार 435 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई प्रित्यर्थ रु. 14 कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 137.76 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 98.43 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.
000
राजू धोत्रे/विसंअ/14.11.22