• Wed. Nov 27th, 2024

    जिल्हा क्रीडा संकुलात वॉकिंग ट्रॅकसाठी ५० लक्ष रुपये तातडीने मंजूर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 8, 2022
    जिल्हा क्रीडा संकुलात वॉकिंग ट्रॅकसाठी ५० लक्ष रुपये तातडीने मंजूर – महासंवाद

    चंद्रपूर, दि. 8 नोव्हेंबर : जिल्हा क्रीडा संकुलासह सर्व तालुका क्रीडा संकुलाचाही अत्याधुनिक सोयीसुविधांनी कायापालट करण्याचा निर्धार आपण केला आहे. सध्यास्थितीत जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक निर्माण करण्यात आला आहे. सिंथेटिक ट्रॅक हा फक्त खेळाडूंसाठी धावण्याच्या सरावाकरिता आहे. मात्र इतर नागरिकही या ट्रॅकवरून वॉकिंग करीत असतात. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी सिंथेटिक ट्रॅकच्या व्यतिरिक्त वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने 50 लक्ष रुपये मंजूर केले. तसेच हा निधी दोन दिवसात नाविन्यपूर्ण योजनेतून क्रीडा विभागाला वर्ग करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

    जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नियोजन भवन येथे बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, क्रीडा उपसंचालक डॉ. शेखर पाटील, डॉ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते.

    जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रातील कमतरता आणि उणिवा काय आहे, याचा अभ्यास करून आपल्याला पुढे जायचे आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सद्यस्थितीत जिल्हा क्रीडा संकुल येथे 12 कोटी रुपये खर्च करून 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, हिरवळ फुटबॉल मैदान आणि मुलामुलींच्या चेंजिंग रूमसह प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. याव्यतिरिक्त जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल, सिंथेटिक फ्लोरिंग सह जिम्नॅशियम हॉल, क्रीडा साहित्य, स्केटीगरींग, बहुउद्देशीय हॉल, बास्केटबॉल सिंथेटिक कोर्ट, लॉंग टेनिस सिंथेटिक कोर्ट, फ्लड लाईट, प्रेक्षक गॅलरी विस्तार व दुरुस्तीकरण, संरक्षण भिंत व प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा व विद्युतीकरण आदी बाबींसाठी 44 कोटी निधींचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. जिल्हा क्रीडा संकुल व तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम करताना सर्व बारीक-सारीक गोष्टीबाबत सूक्ष्म नियोजन करावे. पोंभुर्णा तालुका क्रीडा संकुलमध्ये पिण्याचे पाण्याची व्यवस्था व स्ट्रीट लाईटची व्यवस्था तातडीने करावी. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या जिल्ह्यातील तरुण-तरुणी पोलीस भरतीसाठी सराव करीत आहे. या तरुणांना सराव करण्यासाठी क्रीडा संकुल समितीमार्फत दर्जेदार साहित्य तात्काळ उपलब्ध करून द्यावे.

    चंद्रपूर तालुक्यातील क्रीडा संकुल हे घुग्गुस येथे निर्माण होणार आहे. येथे प्रदूषणाची समस्या बिकट आहे. त्यामुळे खेळाच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, ही आपली प्राथमिकता आहे. त्यामुळेच येथे तालुका क्रीडा संकुल व अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय निर्माण करण्याला आपले प्राधान्य आहे. संपूर्ण जिल्ह्यात फक्त चंद्रपूर तालुका आणि जिवती तालुक्यात स्टेडियम नाही. त्यामुळे जिवती येथील स्टेडियमसाठी पाच एकर जागेचा प्रस्ताव तातडीने पाठवावा.

    पालकमंत्री पुढे म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यात क्रीडा विभागात स्थायी व कंत्राटी रिक्त पदे किती आहेत याबाबत संक्षिप्त माहिती देण्यात यावी. तसेच जिल्ह्यात विविध क्रीडा क्षेत्रात कार्यरत एकूण क्रीडा संस्था किती, खाजगी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेकडे असलेल्या व्यायाम शाळांची संख्या, त्यातील सुस्थितीत किती, याबाबतची माहिती अवगत करावी. सर्व तालुक्याच्या ठिकाणी स्टेडियमचे नियोजन करावे. चांदा क्लब ग्राउंडची रचना काय आहे, ते कोणामार्फत चालविले जाते, अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका काय, येथील क्रिकेट अकादमी आणि बीसीसीआय सोबत मिळून काही नाविन्यपूर्ण करता येते का? याबाबत जिल्हा क्रीडा संकुल समितीने अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करावा. तसेच बल्लारपूर मध्ये खेलो इंडिया प्रस्तावाची सद्यस्थिती काय आहे, याबाबत क्रीडा विभागाने माहिती द्यावी. एका वर्षात जिल्ह्यातील तीन ते चार स्टेडियम परिपूर्ण सुविधांसह सज्ज करावे. तसेच आर्चरी व भालाफेकसाठी सुविधा निर्माण करण्याचे नियोजन क्रीडा विभागाने करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री मुनगंटीवार यांनी दिल्या.

    तत्पूर्वी गुजरात येथील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चंद्रपूरच्या जॉय लाकडे याने 400 मीटर रिले स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकवल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

    दीपक पेंदाम यांच्या कुटुंबीयांना पाच लाखाचा धनादेश सुपूर्द

    सावली तालुक्यातील खेडी येथील रहिवासी महावितरणचे लाईनमन दीपक पेंदाम हे चेकहत्तीबोडी येथे काम करीत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघाती मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री सहायता निधीतून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाच लक्ष रुपयाचे अर्थसहाय्य तात्काळ मंजूर करून आणले. या रकमेचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते दीपक पेंदाम यांच्या कुटुंबीयाकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच दीपक पेंदाम यांना दोन छोट्या मुली असल्यामुळे विशेष बाब म्हणून 1200 रुपये महिना अनुदान तात्काळ सुरू करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी सावली तहसीलदारांना दिल्या. एवढेच नाही तर महावितरणकडून अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याबाबत काही नियोजन करता येईल, का त्याचाही विचार करावा, असेही पालकमंत्री म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed