सातारा दि. 5- पाटण तालुक्याच्या वैभवात भर घालणारी आणि नागरिकांना चांगल्या सुविधा देणारी अशी सुंदर इमारत उभी राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण येथील प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुनगिलवार, प्रांताधिकारी सुनील गाढे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनावणे आदी उपस्थित होते.
राज्य शासन 100 टक्के संगणकीकरणाकडे वाटचाल करत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पाटण येथे प्रशासकीय इमारत होणे गरजेचे होते. या इमारतीच्या 15 कोटी रुपयांच्या कामाचा पहिला टप्पा आज सुरू होत आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. न्यायालयाची चांगली इमारत यापूर्वी उभी राहिली आहे, मल्हारपेठ येथे पोलिस वसाहत उभी रहात आहे. तालुक्याचा विकास वेगाने होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
नागरिकांना चांगल्या आणि वेळेत सुविधा देण्यासाठी प्रशासन गतिमान असणे गरजेचे असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, त्यासाठी प्रशासाकीय अधिकारी यांना चांगल्या सुविधा देणेही तितकेच गरजेचे आहे. पोलिसांना गाड्या दिल्या आहेत. बीट मार्शलांना दुचाकी दिल्या आहेत, त्यामुळे साताऱ्यात महाविद्यालयाच्या परिसरात मुलींच्या छेडछाडीच्या घटना कमी झाल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबध्द आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जिल्ह्याच्या विकासासाठी परिपूर्ण आराखडा तयार करण्यास सांगितला आहे. त्याप्रमाणे तो तयार करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
प्रस्तावनेमध्ये श्री. सोनावणे यांनी इमारतीच्या रुपरेषेविषयी माहिती दिली. आभार प्रदर्शन प्रांताधिकारी श्री. गाढे यांनी केले.