• Sat. Sep 21st, 2024

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

ByMH LIVE NEWS

Sep 28, 2022
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 28 : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकास कार्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सीएसएमटी रेल्वे स्थानकासह एकूण तीन रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यासाठी १० हजार कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससहित नवी दिल्ली आणि अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यास मंजुरी देण्यात आली आहे. या पुनर्विकास कार्यासाठी १० हजार कोटींच्या निधीलाही मंजुरी देण्यात आल्याचे पत्र सूचना कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयामुळे देशातील रेल्वे स्थानकांच्या विकासाला नवी दिशा प्राप्त होणार आहे. देशातील एकूण १९९ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून या दिशेने टप्प्या-टप्प्याने कार्य सुरु आहे. यातील ४७ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून ३२ रेल्वे स्थानकांचे पुनर्विकास कार्य प्रगतीवर आहे.

रेल्वे स्थानक पुनर्विकास कार्यांतर्गत रेल्वे स्थानकावर खाद्य व वस्तू विक्रेत्यांसाठीची जागा, कॅफेटेरिया, मनोरजंन सुविधांसह प्रवाशांना बसण्याची उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे. फूड कोर्ट, प्रतीक्षालय, मुलांना खेळण्यासाठी जागा, स्थानिक वस्तूंच्या खरेदीची जागा, सिटी सेंटर उभारणे आदी  बाबींचा यात समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed