• Sat. Sep 21st, 2024

पर्यटनस्थळ स्वच्छ व सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

ByMH LIVE NEWS

Sep 26, 2022
पर्यटनस्थळ स्वच्छ व सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.26 : गेट वे ऑफ इंडिया हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र  आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.पर्यटन स्थळ स्वच्छ व सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य आहे. गेट वे ऑफ इंडिया परिसर स्वच्छता अभियानात सर्वजण सहभागी झाले आहेत. या उपक्रमास सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, असे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधनू  गेट वे ऑफ इंडिया परिसरात स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पर्यटनमंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी नगरसेवक हर्षिता नार्वेकर,मकरंद नार्वेकर,पर्यटन संचालक मिलींद बोरीकर, श्रीमती अमृता फडणवीस, सहायक संचालक धनंजय सावळकर,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त एस.के.गुरव, दिव्याज फाउंडेशन, ब्राईट फ्युचर या संस्थानी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग  घेतला.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छता अभियानास मोठ्या प्रमाणात गती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील पर्यटनाला गती मिळावी. पर्यटन स्थळे अधिक सुंदर व्हावी यासाठी आपण भर देणार आहोत.आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐतिहासिक व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गेट-वे ऑफ इंडिया परिसर अधिक सुंदर दिसेल. तुमचा सर्वांचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे असे मतही मंत्री श्री.लोढा यांनी व्यक्त केले.

स्वच्छ शहर म्हणून मुंबईला पारितोषिक मिळावे यासाठी आपण प्रयत्न करूया – अमृता फडणवीस

श्रीमती अमृता फडणवीस म्हणाल्या,जिथे स्वच्छता नांदते तिथे शक्ती असते. आपला भारत, महाराष्ट्र व मुंबई हे स्वच्छ असावे यासाठी असे स्वच्छतेचे उपक्रम राबविणे अत्यंत गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत इंदोर या शहराने स्वच्छ शहर म्हणून आपला लौकिक राखला आहे. आगामी स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत मुंबई शहर असावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्वच्छतेचा आग्रह धरून देशात स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविले आहे. आपणदेखील अशा छोट्या उपक्रमातून स्वच्छ शहर करण्यासाठी प्रयत्न करूया, असेही श्रीमती फडणवीस म्हणाल्या.

यावेळी पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा, श्रीमती अमृता फडणवीस, दिव्याज फाऊंडेशन तसेच नागरिकांनी परिसराची स्वच्छता केली.

******

संध्या गरवारे/विसंअ/26.9.22

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed