• Tue. Nov 26th, 2024

    कमी खर्चात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

    ByMH LIVE NEWS

    Sep 26, 2022
    कमी खर्चात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

    पुणे दि.२६ – गुणवत्तेचे  शिक्षण कमी खर्चात मिळत नाही तोपर्यंत सामान्यांसाठी  ते  उपलब्ध होणार नाही. सामान्य जनतेला खाजगी संस्थांमधूनही कमी खर्चात उत्तम शिक्षण मिळावे यासाठी  शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

    प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयातील  विविध शैक्षणिक उपक्रमांच्या  उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे, संस्थेचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे,  प्रा. शामकांत देशमुख,  प्रा.सुरेश तोडकर, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे  आदी उपस्थित होते.

    पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, शिक्षण आणि आरोग्यावर विशेष लक्ष दिल्यास देशाच्या विकासाला चालना मिळू शकेल. त्यामुळे स्वस्त आणि उत्तम शिक्षण सुविधा सर्वांना उपलब्ध असणे आवश्यक आहे. यावर्षी काही महाविद्यालयांना भेट देऊन एफआरएने  निश्चित केलेल्या शुल्काची तपासणी केली जाईल.

    जीवनाला दिशा देणारे शिक्षण गरजेचे

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशाचा आत्मा जागृत करणारे , गतवैभवाची जाणीव करून देणारे आणि भविष्यातील उन्नत ज्ञानाचा आग्रह धरणारे आहे. विद्यार्थ्यांनी प्रयोगशील असावे, त्या प्रयोगांना मान्यता मिळवावी आणि त्याच्या साहाय्याने समृद्धी प्राप्त करावी अशी अपेक्षा आहे. या माध्यमातून जीवनाला दिशा देणारे आणि स्वावलंबी करणारे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे.

    बहुशाखीय पदवी अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना प्रोत्साहन

    नवीन शोध लावणे आणि त्याला बाजारात आणण्याचे हे जग आहे. त्यामुळे नवे शोध लावणाऱ्या तरुणाईमुळे देश आर्थिक विकासाचे उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी होईल. त्याचा पाया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे.  बहुशाखीय अभ्यासक्रम शिकून पदवी मिळविल्यास यशस्वी विद्यार्थी तयार करता येतील. मॉडर्न महाविद्यालयाने असे अभ्यासक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. राज्यात असे अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना शासनातर्फे प्रोत्साहन देण्यात येईल.

    शैक्षणिक संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक विचार करेल, असेही त्यांनी सांगितले. आमदार श्री.शिरोळे म्हणाले, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची महाविद्यालये नावीन्यतेला प्रोत्साहन देत आहेत. कोरोनानंतरच्या काळात या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे.

    डॉ. एकबोटे म्हणाले, शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या देशांचा विकास वेगाने झाला आहे. आपल्या देशाची ओळख विकसीत राष्ट्र अशी करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वेगाने राबवावे लागेल. संस्थेचे कार्यवाह श्री.देशमुख यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

    पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयातील इन्क्युबेशन सेंटर, विद्यार्थ्यांच्या न्यूट्रिडिश स्टार्टअप ॲपचे  उद्घाटन डिजिटल पद्धतीने करण्यात आले. मॉडर्न विधी महाविद्यालयाने तयार केलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या ७५ महत्वाच्या निर्णयांवर आधारित  ‘७५ माईलस्टोन्स’  या पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

    विधी महाविद्यालयाच्या ‘इनोव्हेशिया आयपीआर सेल’,  तसेच ‘आयमॉडर्ना’ आभासी संवादीका, इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या आभासी प्रयोगशाळा उपकरणाचे उद्घाटनदेखील पालकमंत्र्यांच्या हस्ते  करण्यात आले. त्यांच्या हस्ते फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ‘एंजल प्लेयर’ या उपकरणांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed