• Tue. Sep 22nd, 2026

‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांचे निर्देश – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 22, 2026

मुंबई, दि. २२ : आदिवासी विकास विभागामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध लोकाभिमुख उपक्रमांचे काटेकोर नियोजन करून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, सेवा व उपक्रमांची माहिती आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासोबतच लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यावर भर द्यावा, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांनी दिले.

‘सेवा संकल्प अभियान’च्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आयुक्त लीना बनसोड, नागपूर, अमरावती, नाशिक व ठाणे विभागाचे अपर आयुक्त, सर्व प्रकल्प अधिकारी तसेच आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी विविध प्रकल्प व अपर आयुक्त कार्यालयांच्या वतीने अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

विद्यार्थी, आरोग्य व महिला सक्षमीकरणावर भर

सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी आस्थापना, शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये चित्रकला, भाषण, निबंध, वादविवाद, रांगोळी आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर मेळावे आयोजित करून त्यांना शासकीय योजना व उपलब्ध संधींची माहिती देण्यात येत आहे.

आश्रमशाळा व वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून, हिमोग्लोबिन तपासणीवर विशेष भर देण्यात येत आहे. महिला शेतकऱ्यांची नोंदणी तसेच महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

योजनांची गावपातळीवर प्रभावी प्रसिद्धी

आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी चित्ररथ, पथनाट्य, प्रभातफेरी, सेवा यात्रा व लाभार्थी मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. वनहक्क, पेसा, महिला सक्षमीकरण तसेच विविध कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.

स्वच्छता व लोकसहभागातून अभियानाला गती

अभियानांतर्गत आरोग्य तपासणी, रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता, योग व ध्यान सत्रे, व्यसनमुक्ती जनजागृती, करिअर मार्गदर्शन, रस्ता सुरक्षा व सायबर सुरक्षा यांसह विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत. महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ते १७ ऑक्टोबरदरम्यान शाळा व वसतिगृहांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ योजनांची माहिती देणारे अभियान न राहता, शासनाच्या सेवा आणि योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणारे लोकाभिमुख अभियान ठरावे. स्थानिक गरजा व उपलब्ध संसाधनांचा विचार करून अभियानाचे नियोजन करावे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ पोहोचेल, यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

000

अश्विनी पुजारी/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed