सोलापूर, दि. २१ (जिमाका) : सोलापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या मानाच्या आजोबा गणपतीच्या परंपरेला टपाल विभागाच्या विशेष लिफाफ्याच्या अनावरणातून उजाळा मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सांस्कृतिक महोत्सव २०२६’ अंतर्गत आजोबा गणपतीच्या प्रतिमेच्या विशेष टपाल लिफाफ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. आजोबा गणपती उत्सवाला १८८५ पासूनची परंपरा असल्याचे उपलब्ध संदर्भांमध्ये नमूद केले जाते.
यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. त्यांच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक हेमंत खडकीकर यांचे विशेष आभार मानत आजोबा गणपतीची ऐतिहासिक परंपरा व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी विशेष टपाल लिफाफ्याच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजप्रबोधन, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणारे माध्यम ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त करून मंत्री पाटील यांनी आजोबा गणपती ट्रस्टच्या उपक्रमांचे कौतुक केले. विसर्जन मिरवणुकीनंतर गणेशमूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करून वर्षभर भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची परंपरा उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवातील धार्मिक पावित्र्य, मांगल्य आणि परंपरा जपण्याचे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये ध्वनिवर्धक यंत्रणा, प्रकाशयोजना आदींचा वापर करताना नियमांचे पालन करणे आवश्यक असून, विसर्जनासाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेचे आणि धार्मिक परंपरांचे पालन करण्यावर भर देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. यंदाच्या गणेशोत्सवातील मिरवणुका शांततेत व उत्साहात पार पडतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी उपस्थितांचे स्वागत करून आजोबा गणपतीला मिळालेला सन्मान हा सोलापूरकरांसाठी आनंदाची बाब असल्याचे सांगितले. आजोबा गणपतीच्या ऐतिहासिक परंपरेचे जतन करण्याची जबाबदारी सर्वांची असून, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोणताही जातिभेद न ठेवता विविध समाजघटक एकत्र येतात, ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक पावित्र्य जपत काढली जाते. ही परंपरा जपण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास एपीएमजी, पुणे रीजनचे अविनाश पाखरे, सोलापूर विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर हेमंत खडकीकर, माजी राज्यमंत्री तथा ट्रस्टचे अध्यक्ष विजयकुमार देशमुख, नगरसेवक अमोल शिंदे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, गणेशभक्त व नागरिक उपस्थित होते.
००००