• Wed. Sep 23rd, 2026

‘जनसंवाद’ कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी स्वीकारली १ हजारावर निवेदने – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 21, 2026

अमरावती, दि. २१ (जिमाका): शेती व अन्य कामांसाठी रेती, माती वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची अडवणूक करू नये, जिल्हा प्रशासनातील सर्व कार्यालयांनी आठवड्यात दुपारी ३ ते ५ दरम्यान वेळ निश्चित करून अभ्यागतांना भेटा व त्यांचे प्रश्न सोडवा अशा सूचना देत पत्रकारांना निवासासाठी एकाच ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देत महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात जवळपास १ हजारांहून अधिक निवेदने स्वीकारली.

नियोजन भवनात पालकमंत्री श्री. बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तरुण, तरुणीपासून महिला, पुरुष, वरिष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींनी यावेळी श्री. बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन सोपविले. या सर्व नागरिकांची त्यांनी आस्थेने चौकशी करून संबंधित विभागाकडून वेळेत अडचणी दूर करण्याचा विश्वास दिला.

जमीन मोजणी, जमिनीचा ताबा मिळूनही मालकी हक्क मिळालेला नाही, मुख्य रस्त्याशेजारील नाले दुरुस्ती, योजनेचा लाभ अशा विविध विषयांवर यावेळी निवेदने देण्यात आली. ही सर्व निवेदने संबंधित विभागाकडून तातडीने निकाली काढणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिला.

नियोजन भवनासमोर उपस्थित दिव्यांग व्यक्तींची आस्थेने चौकशी करून त्यांचे प्रश्न समजून घेत अडचणी दूर करण्याचा विश्वास दिला.

जनसंवाद कार्यक्रमाला आमदार सर्वश्री प्रवीण तायडे, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रतापदादा अडसड, प्रवीण पोटे, उमेश यावलकर, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले आदी उपस्थित होते.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed