• Tue. Sep 22nd, 2026

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ऑफलाइन प्रस्ताव स्वीकारावेत – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 22, 2026

मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची राज्यात प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आवश्यकतेनुसार ऑफलाइन पद्धतीने प्रस्ताव स्वीकारून त्यावर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी आवश्यक ऑनलाइन पोर्टलच्या सद्यस्थितीबाबत मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत मंत्री राणे यांनी आढावा घेतला. योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत प्राप्त झालेल्या एकूण प्रस्तावांची तपासणी करून पात्र प्रस्तावांवर नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून प्रगतीचा आढावा घेणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांनी सांगितले. मत्स्य व्यवसायाशी संबंधित नागरिक, मच्छीमार आणि पात्र लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने आणि गतिमानतेने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यआयुक्त भानुदास पालवे, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक भुवनेश्वरी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0000

मनिषा सावळे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed