• Fri. Sep 18th, 2026

बीड-पुणे रेल्वेसेवेचा शुभारंभ; मराठवाड्याची कन्या म्हणून विशेष अभिमान – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 17, 2026

बीड, दि १७ (जिमाका): मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक व आनंददायी ठरला. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या ‘बीड-पुणे’ थेट रेल्वेसेवेचा आज उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे आणि धानोरा रस्त्यावरील ‘पंढरी’ येथील विज्ञान उद्यान व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजनही पार पडले.

यावेळी खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके,  आमदार विजयसिंह पंडित, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत आदी उपस्थित होते.

बीड जिल्हा अनेक दशके रेल्वे नकाशापासून दूर असल्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून आज सुरू झालेल्या या थेट रेल्वेसेवेमुळे बीडकरांची अनेक वर्षांच्या प्रतीक्षेची पूर्तता झाली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वप्नांना उजाळा दिला. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी रेल्वे जोडणीला नेहमीच प्राधान्य दिले होते. गेल्या वर्षी १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवा सुरू करताना, पुढील वर्षी बीडकरांना थेट पुण्यापर्यंत प्रवास करता येईल, असा शब्द देण्यात आला होता. आज तोच शब्द पूर्ण करताना मराठवाड्याची कन्या म्हणून मला विशेष अभिमान वाटत आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच, येत्या काही महिन्यांत बीड ते पनवेल ही थेट रेल्वेसेवा सुरू करण्याचा मानस व्यक्त करत, बीड-परळी मार्ग पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग थेट दक्षिण भारताशी जोडला जाईल आणि त्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रेल्वेच्या शुभारंभासोबतच बीड शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ आज रोवली गेली. बीडच्या स्थानिक कलाकारांसाठी अनेक दशकांपासून हक्काचे व्यासपीठ असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी प्रशासकीय पातळीवर मंजूर करण्यात आला असून, जुन्या भिंती कायम ठेवत येथे अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था, साउंड इकोस्टिक, सेंट्रल एसी, आरामदायी आसनव्यवस्था आणि आधुनिक ग्रीन रूम्स उभारण्यात येणार आहेत. यासोबतच, धानोरा रस्त्यावरील ‘पंढरी’ येथे सुमारे २८ कोटी रुपये खर्चाचे भव्य तारांगण व विज्ञान उद्यान उभारले जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत १४ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली असून, या ठिकाणी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), आभासी तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्राची सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाच्या समारोपात पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी १७ सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हैदराबाद मुक्ती संग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या व तुरुंगवास भोगलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. तसेच, आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्याने त्यांनाही मंचावरून शुभेच्छा देण्यात आल्या. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.

यावेळी रेल संख्या ‘झिरो वन फोर झिरो वन’ प्रस्थान के लिए तयार है, हा आवाज परिसरात घुमला आणि इंजिनाने पुढच्या प्रवासासाठी वेग घेतला.

यावेळी भारतीय रेल्वेचा महाराष्ट्र राज्याच्या विकासात योगदान या विषयावर निबंध आणि चित्रकला स्पर्धेमधील उत्तीर्ण शाळकरी विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी प्रास्ताविक केले तर विभागीय रेल्वे प्रबंधक राजेशकुमार वर्मा, तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed