रायगड-अलिबाग दि.१७ (जिमाका) : पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वावलंबी आणि उद्योजक बनविण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, पात्र असलेल्या प्रत्येक कारागिरापर्यंत योजनेचे लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमानतेने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रायगड आयोजित पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळावा नियोजन भवन, अलिबाग येथे संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुधीर गायकवाड, उपायुक्त उद्योग व सेवा, जी.एस.हरळ्या, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी भागवत, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी. जे. डोलकर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.गोगावले म्हणाले की, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या पुढाकाराने आयोजित या मेळाव्यात पारंपरिक कारागिरांना कौशल्यविकास, आधुनिक साधने आणि आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. पीएम विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कारागीर आणि हस्तकला क्षेत्रातील बांधवांना सन्मान, कौशल्यवृद्धी आणि आर्थिक बळ देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. सुतार, लोहार, कुंभार, विणकर, चर्मकार, नाभिक, धोबी, शिंपी, गवंडी यांसह विविध पारंपरिक व्यवसायातील कारागिरांच्या कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचे काम या योजनेतून होत आहे.
जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतींपैकी ७८६ ग्रामपंचायती पीएम विश्वकर्मा योजनेच्या पोर्टलवर ऑनबोर्ड झाल्या आहेत. जिल्ह्यातील १५ हजार २७२ कारागिरांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, त्यापैकी ३ हजार ३८५अर्जांना मंजुरी मिळाली आहे. आतापर्यंत १ हजार ७९८ लाभार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, ९२३ कारागिरांना १५ हजार रुपयांचे टूलकिट देण्यात आले आहे. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मूलभूत प्रशिक्षणादरम्यान दररोज ५०० रुपये विद्यावेतन, प्रशिक्षणानंतर टूलकिटसाठी १५ हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन तसेच व्यवसायवाढीसाठी तारणमुक्त कर्जसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. पात्र लाभार्थ्यांना कर्जवाटपाची प्रक्रियाही सुरू आहे.
प्रशासन आणि बँक प्रतिनिधींनी प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करावी. उर्वरित २२ ग्रामपंचायतींचे ऑनबोर्डिंग पूर्ण करण्याबरोबरच प्रशिक्षण बाकी असलेल्या १ हजार ५८७ कारागिरांचे प्रशिक्षण तातडीने सुरू करावे, अशा सूचना पालकमंत्री गोगावले यांनी दिल्या. पात्र कारागिरांच्या कर्जप्रकरणांची विनाकारण विलंब न करता पूर्तता करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की, बदलत्या काळानुसार पारंपरिक कारागिरांनी नवीन कौशल्ये आत्मसात करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. ड्रोन दुरुस्ती, सोलर यंत्रणेची देखभाल यांसारख्या नव्या क्षेत्रांमध्येही कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होत आहेत. पात्र कारागिरांनी योजनेचा लाभ घेऊन आपल्या कौशल्याचे आर्थिक मूल्य वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात श्री.हरळ्या म्हणाले की, जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ३८५ लाभार्थ्यांना प्रशिक्षणासाठी मान्यता मिळाली असून, १ हजार ७९८ लाभार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. १९९ लाभार्थ्यांना कर्जवाटप करण्यात आले असून, ९२३ लाभार्थ्यांना टूलकिट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकही पात्र कारागीर योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हास्तरीय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000