• Tue. Sep 15th, 2026

कृषी उत्पन्न बाजार समित्या रोजगारनिर्मितीची केंद्रे बनवणार – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 15, 2026

  • २९ सप्टेंबरच्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभा’त राज्यातील २०० बाजार समित्यांचा सहभाग

मुंबई, दि. १५ : कृषी उत्पन्न बाजार समित्या केवळ शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे केंद्र न राहता रोजगारनिर्मिती, व्यापारवृद्धी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारी महत्त्वाची केंद्रे म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना केवळ रोजगार शोधणारे नव्हे, तर रोजगार देणारे उद्योजक बनविण्यासाठी बाजार समित्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

२९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यात एकाच दिवशी, एकाच वेळी १ हजार ठिकाणी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे. या महाकुंभात राज्यातील सुमारे २०० कृषी उत्पन्न बाजार समित्या सहभागी होणार असून, बाजार समिती स्तरावर युवकांना रोजगार, व्यवसाय व कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या रोजगार महाकुंभासाठी राज्यातील बाजार समित्यांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापतींची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. या बैठकीस कौन्सिल ऑफ स्टेट ॲग्रीकल्चरल मार्केटिंग बोर्ड्सचे कार्यकारी संचालक जे. एस. यादव, पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक व मॅग्नेट प्रकल्प संचालक विनायक कोकरे, डॉ. अमोल यादव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री रावल म्हणाले, “आपल्या बाजार समित्यांमध्ये शेतकरी शेतमाल विक्रीसाठी येतो. त्या शेतकऱ्याच्या मुलाला आपण व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिक बनविले पाहिजे. त्याच्या हातात रोजगारांच्या माध्यमातून इतरांना रोजगार देण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. हीच रोजगारनिर्मितीची खरी दिशा आहे.”

कृषी क्षेत्राशी संबंधित प्रक्रिया उद्योग, साठवणूक, वाहतूक, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, ग्रेडिंग, ब्रँडिंग, विपणन आणि निर्यात या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. ट्रक ड्रायव्हिंगपासून लॉजिस्टिक्स, अन्नप्रक्रिया, पॅकेजिंग आणि आधुनिक बाजारपेठ व्यवस्थापनापर्यंत विविध कौशल्याधारित रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समित्यांनी पुढाकार घ्यावा, असेही मंत्री रावल यांनी सांगितले.

“महाराष्ट्राचा शेतमाल केवळ राज्यातील बाजारपेठांपुरता मर्यादित न राहता काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, ईशान्य भारतापासून देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आणि पुढे जगातील प्रमुख शहरांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी शेतमालावर प्रक्रिया, योग्य साठवणूक, वाहतूक, आकर्षक पॅकेजिंग आणि प्रभावी ब्रँडिंगची संपूर्ण परिसंस्था उभी करावी लागेल. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल,” असे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.

रोजगार महाकुंभाच्या आयोजनासाठी बाजार समित्यांनी आवश्यक त्या ठिकाणी स्टॉल उभारणे, उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील रोजगारदाते सहभागी करून घेणे, कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच बाजार समित्यांच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधींची व्यापक प्रसिद्धी करणे, अशा सूचना मंत्री रावल यांनी यावेळी केल्या.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही बाजार समित्यांनी रोजगार महाकुंभाच्या आयोजनात सहकार्य करण्याचे आवाहन केले.

“कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे केवळ माल येतो आणि विकला जातो अशी व्यवस्था नाही. ती रोजगाराचे मोठे केंद्र, व्यापाराचे केंद्र आणि अर्थव्यवस्थेला गती देणारे महत्त्वाचे केंद्र आहे. बाजार समित्यांची ही नवी भूमिका महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर प्रभावीपणे सिद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे,” असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed