मुंबई, दि. १५ : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील महसुली प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी कोल्हापूर येथे महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे (एमआरटी) स्वतंत्र खंडपीठ स्थापन करावे, अशी मागणी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले.
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील महसूलविषयक विविध दावे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा गतीने निपटारा होण्यासाठी कोल्हापूर येथे महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे स्वतंत्र खंडपीठ सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री आबिटकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कार्यरत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे स्वतंत्र खंडपीठ सुरू झाल्यास संबंधित जिल्ह्यांतील नागरिकांना महसुली प्रकरणांच्या सुनावणीसाठी दूरवर प्रवास करावा लागणार नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचून त्यांना गतिमान, सुलभ व परिणामकारक न्याय मिळण्यास मदत होईल, असेही मंत्री आबिटकर यांनी म्हटले आहे.
महसुली प्रकरणांचा वाढता भार आणि नागरिकांची सोय लक्षात घेऊन कोल्हापूर येथे स्वतंत्र एमआरटी खंडपीठ स्थापन करण्यास शासनाने प्राधान्याने मान्यता द्यावी, अशी आग्रही मागणी मंत्री आबिटकर यांनी केली आहे.
००००
मनिषा सावळे/विसंअ