मुंबई, दि. १५ : पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषी बाजाराच्या उभारणीला गती देण्यासाठी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. वाढवण बंदराच्या निकटतेचा लाभ घेऊन महाराष्ट्रातील शेतमालाला जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षमपणे पोहोचविण्यासाठी दापचरी येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजार प्रकल्प राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाजारव्यवस्थेशी जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी गतीने नियोजन करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
बैठकीस भारतातील विविध राज्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि पणन मंडळांना समन्वयित करणाऱ्या कौन्सिल ऑफ स्टेट ॲग्रीकल्चरल मार्केटिंग बोर्ड्सचे कार्यकारी संचालक डॉ. जे. एस. यादव उपस्थित होते. याशिवाय महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक आमदार चरणसिंह ठाकूर, पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक व मॅग्नेट प्रकल्प संचालक विनायक कोकरे, डॉ. अमोल यादव यांच्यासह संबंधित अधिकारीही बैठकीस उपस्थित होते.
यावेळी पणन मंत्री रावल म्हणाले की, दापचरी येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजार प्रकल्पाद्वारे शेतमालाची खरेदी-विक्री, प्रतवारी, पॅकेजिंग, शीतसाखळी, साठवणूक, गुणवत्ता तपासणी, ई-लिलाव, कंटेनर वाहतूक आणि निर्यात सुलभता अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा तसेच देशातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विकसित करण्यात येईल. त्यामुळे शेतमालाच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनात सुधारणा होऊन शेतकऱ्यांना दर्जानुसार अधिक चांगला भाव मिळण्यास मदत होईल.
वाढवण बंदरापासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर सुमारे १४०० एकर परिसरात उभारण्यात येणारा हा प्रकल्प फ्रान्समधील रुंगीस मार्केट, नेदरलँड्समधील रॉयल फ्लोरा हॉलंड तसेच रॉटरडॅम बंदर परिसरातील आधुनिक कृषी लॉजिस्टिक व्यवस्थेच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय चीन, दक्षिण आफ्रिका या देशांतील उत्तम मार्केटचा अभ्यास करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. दापचरी बाजाराला वाढवण डीपवॉटर पोर्टसह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू बंदर, राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे संपर्क तसेच प्रस्तावित बुलेट ट्रेन यांची जोड मिळणार आहे. या सक्षम लॉजिस्टिक जाळ्यामुळे फळे, भाजीपाला, फुले, धान्य, कडधान्ये, मसाले तसेच प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांची निर्यात अधिक वेगवान व किफायतशीर होईल, असा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला.
कृषी बाजारव्यवस्थेतील आधुनिक बदल, बाजारांचे परस्पर जाळे, मूल्यसाखळी विकास आणि शेतमालाच्या निर्यातीच्या संधी यांचा आढावा मंत्री रावल यांनी यावेळी घेतला. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि राष्ट्रीय स्तरावरील पणन संस्थांमध्ये समन्वय वाढवून दापचरी प्रकल्पाला आदर्श कृषी-व्यापार केंद्राचे स्वरूप देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रस्तावित प्रकल्प केवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार नव्हे, तर या ठिकाणी जागतिक दर्जाचे ‘फूड हब’ उभारण्याचे नियोजन असल्याचे मंत्री रावल यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील विविध प्रकारचा कृषी माल प्रक्रिया करून देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरेल. “भारतातीलच नव्हे, तर जगातील एक मोठे फूड हब महाराष्ट्रात उभे करण्याचा शासनाचा संकल्प आहे,” असे रावल म्हणाले.
राज्यात आंतरराष्ट्रीय बाजार, राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती अशी त्रिस्तरीय विपणन व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन असून, त्यातून कृषी मालाच्या मूल्यसाखळीला बळकटी मिळणार आहे. निर्यात बाजार सुविधांचे एकत्रीकरण, काढणीनंतरचे मूल्यवर्धन, संगणकीकृत व पारदर्शक व्यवहार आणि आधुनिक बाजार पायाभूत सुविधा यावर या ठिकाणी विशेष भर दिला जाणार असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.
डॉ. जे. एस. यादव यांनी देशातील कृषी बाजारांच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असलेल्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. पारदर्शक व्यवहार, डिजिटल बाजारव्यवस्था, गुणवत्ता निश्चिती आणि प्रभावी पुरवठा साखळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दापचरी प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल, तसेच याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीही होईल, असा विश्वास मंत्री रावल यांनी यावेळी व्यक्त केला.
००००