• Tue. Sep 15th, 2026

सेवा संकल्प अभियानातून आदिवासी बांधवांचे वनहक्कविषयक प्रश्न निकाली काढावेत – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 15, 2026

मुंबई, दि. १५ : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत आदिवासी बांधवांचे वनहक्कविषयक प्रलंबित प्रश्न प्राधान्याने आणि कालबद्ध पद्धतीने निकाली काढावेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

सेवा संकल्प अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री यांच्या समिती कक्षात आयोजित बैठकीत मंत्री बावनकुळे बोलत होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, अभियानादरम्यान पात्र आदिवासी बांधवांना वनहक्कपट्ट्यांचे वितरण करावे. यापूर्वी वितरित केलेल्या पट्ट्यांमधील त्रुटी दुरुस्त करून संबंधितांना ७/१२ नमुने उपलब्ध करून द्यावेत. आदिवासी बांधवांच्या मालमत्तांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याची कार्यवाहीही प्राधान्याने पूर्ण करावी.

वनहक्कपट्ट्यांच्या नियमितीकरणाबाबत एमआरसॅकच्या उपलब्ध डेटाचा वापर करून निर्णय घ्यावा. ग्रामस्तरीय समित्यांनी मंजूर केलेले वनपट्ट्यांबाबत प्राप्त दावे व हरकतींचे नियमानुसार पुनर्विलोकन करावे. अन्नसुरक्षा समित्यांची स्थापना करण्याची कार्यवाहीही तातडीने पूर्ण करावी. मंत्रालय स्तरावर उपविभागीय अधिकारी यांची बैठक घेऊन संबंधित आमदारांना अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती द्यावी, अशा सूचनाही मंत्री बावनकुळे यांनी दिल्या.

आदिवासी विभागाच्या आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांचे २८ सप्टेंबर रोजी आरोग्य तपासणी करावी – आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची २८ सप्टेंबर रोजी आरोग्य तपासणी करण्यात यावी. प्रत्येक विद्यार्थ्याचे आरोग्य कार्ड तयार करून त्यांच्या आरोग्यविषयक नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. तपासणीत निदर्शनास येणाऱ्या आजारांवर आवश्यक उपचार आणि पुढील कार्यवाही सुनिश्चित करावी, असे मंत्री प्रा. वुईके यांनी सांगितले.

भागातील संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी २२ सप्टेंबरपर्यंत स्थानिक आमदारांसोबत बैठक घ्यावी. अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची सविस्तर माहिती त्यांना देऊन लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अंमलबजावणीत समावेश करावा.

राणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त ५ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. या कार्यक्रमांना संबंधित लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे. आदिवासी विकास विभागाच्या योजना तसेच शैक्षणिक आणि सामाजिक योजनांची माहिती देणारे चित्ररथ १६ सप्टेंबरपासून विविध भागांत प्रचार-प्रसिद्धी करणार आहेत. या चित्ररथांना संबंधित लोकप्रतिनिधींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीला राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार मंजुळा गावित, डॉ. किरण लहामाटे, आमश्या पाडवी, राजू तोडसाम, दिलीप बोरसे, रामदास मसराम, हिरामण खोसकर, नितीन पवार, डॉ. मिलिंद नरोटे, संजय पुराम, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे उपस्थित होते.

आदिवासी आयुक्त गोपीचंद कदम तसेच अपर आदिवासी आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

००००

निलेश तायडे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed