• Fri. Sep 4th, 2026

FDA New Rule : तुकाराम मुंढेंचा कडक आदेश, सामूहिक जेवण किंवा भंडाऱ्याचं नियोजन करायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट करावीच लागेल

तुकाराम मुंढे यांनी आगामी गोपाळाष्टमी, गणेशोत्सव आणि इतर सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. सणासुदीला अन्नदान आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना आता एफडीएला कल्पना द्यावी लागेल. मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्यात आता आगामी काळात सणवार सुरु होत आहेत. राज्यासह देशभरात उद्या कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह असणार आहे. त्यानंतर गोपाळकाला असणार आहे. दहीहंडीचा उत्साह संपत नाही तोच काही दिवसांनी गणेशोत्सव असणार आहे. गणेशोत्सव पाठोपाठ नवरात्री, दसरा आणि नंतर दिवाळी असे अनेक विविध सण राहणार आहेत. फक्त हिंदू धर्मच नाही तर इतरही धर्मीय नागरिकांचे सणवार असणार आहेत. या सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सणासुदीला भंडारा, अन्नदान किंवा सामूहिक जेवणाचा कार्यक्रम आयोजन करणाऱ्यांना आता अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

सण-उत्सवाच्या कालावधीत मिठाई, खवा, पनीर, तूप, दूध, खाद्यतेल, बेसन आणि सुका मेवा यांसारख्या अन्नपदार्थांची मागणी अल्पावधीत अनेकपटीने वाढते आणि त्याच अनुषंगाने भेसळ, बनावट उत्पादन आणि असुरक्षित अन्नाच्या पुरवठ्यास आर्थिक प्रोत्साहन निर्माण होते. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने वर्षभरातील सर्व सण, उत्सव, यात्रा, उरूस आणि इतर धार्मिक पर्वांसाठी कायमस्वरूपी लागू राहणारा सर्वसमावेशक स्थायी आदेश लागू केला आहे.

सामूहिक अन्नवाटपाबाबत आदेश जारी

महाप्रसाद, इफ्तार मेजवानी, अन्नछत्र, लंगर व भंडारा अशा स्थळांना अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अन्न सुरक्षा कायदा व मानके यांचे पालन होते की नाही याची खात्री करावयाची आहे. अन्न शिजविणारा व पुरविणारा केटरर हा “Caterer” या व्यवसाय प्रकाराखाली परवानाधारक असणे कायद्याने आवश्यक असून, त्याने परिशिष्ट-क मधील नमुन्यात कार्यक्रमापूर्वी किमान सात दिवस अगोदर पदनिर्देशित अधिकाऱ्यास पूर्वसूचना द्यावयाची आहे. आयोजक मंडळे व संस्थांनी केवळ वैध परवानाधारक केटररमार्फतच अन्नवाटप करावे.

Maharashtra TimesPune News : वडिलांवर हात उचलणारा ते बापटांना मारहाण करणारा; पुण्यात थरार घडवणाऱ्या संतोष चव्हाणची धक्कादायक पार्श्वभूमी

अन्न व्यवसाय चालकांसाठी नियम काय?

  • वैध परवाना अथवा नोंदणी योग्य व्यवसाय प्रकाराखाली धारण करून ती ” Food Safety Connect” अॅपच्या QR Code सह दर्शनी भागात प्रदर्शित करावी.
  • कच्चा माल केवळ परवानाधारक अथवा नोंदणीकृत पुरवठादारांकडूनच बिलासह खरेदी करावा व अभिलेख किमान एक वर्ष जतन करावेत.
  • परवानगी नसलेले खाद्यरंग, अखाद्य घटक व औद्योगिक रसायनांचा वापर करू नये; वापरलेले स्वयंपाकाचे तेल केवळ प्राधिकृत RUCO संकलकांकडेच द्यावे.
  • अन्न हाताळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे वार्षिक वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र व दर पंचवीस हाताळणाऱ्यांमागे किमान एक FOSTaC प्रमाणित अन्न सुरक्षा पर्यवेक्षक आवश्यक.