• Tue. Sep 1st, 2026

Tarannum Khan : हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न, पण नियतीने दुसऱ्या मार्गाला नेलं अन् ठरली मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बारबाला , तेलगीने एका रात्रीत तिच्यावर 90 लाख उधळले

मुंबईत 1992-93 च्या काळात हिंदू-मुस्लीम दंगल उसळली होती. या दंगलीत तरन्नुम खान हिचं सायन येथील घर जळालं होतं. परिस्थिती अत्यंत बेताची होती. अशा परिस्थितीत हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरन्नुमला बारबाला व्हावं लागलं. पण पुढे ती मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बारबाला ठरली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबईत एकेकाळी गुन्हेगारीने टोक गाठलं होतं. गँगवॉर, स्मगलिंग, खून, दरोडा, खंडणी असे प्रकार सर्रासपणे व्हायचे. अर्थात या काळात मुंबई पोलिसांनी जी कामगिरी करुन दाखवली ती वाखणण्याजोगी आहे. यामुळेच मुंबई पोलिसांचं नाव संपूर्ण जगात आदराने घेतलं जातं. गुन्हेगारी संपवण्यासाठी अनेक धडाकेबाज पोलीस अधिकाऱ्यांनी कुख्यात गुंडांचे एन्काउंटर केले. एन्काउंटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी या गुन्हेगारीचा बिमोड केला. पण या मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वातील वास्तिव कथा खूप चित्तथरारक अशा आहेत. याच गुन्हेगारांच्या कथा आम्ही तुम्हाला सांगत आहोत. अर्थात गुन्हेगारीला प्रोत्साहन देणं असा आमचा हेतू नाही. तर मुंबईत ज्या घटना घडून गेल्या आहेत त्याची माहिती वाचकांपर्यंत पोहोचावी, असाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

मुंबईत कुख्यात गुन्हेगारांमध्ये केवळ पुरुष गुन्हेगारांचा समावेश होता, असं नाही. तर अनेक महिला गुन्हेगारांचं देखील या विश्वासवर वर्चस्व राहिलेलं आहे. विशेष म्हणजे केवळ एखाद्या डॉनची पत्नी, प्रेयसी किंवा नातेवाईक असलेल्या महिलांचं विविध गुन्हेगारांवर वर्चस्व राहायचं असं नाही. तर अनेक मादक सौंदर्य असणाऱ्या तरुणीदेखील गुन्हेगारांना घायाळ करायचे.

एका बारबालाची कहाणी

मुंबईतील गुन्हेगारी क्षेत्राविषयी माहिती देणाऱ्या आपल्या आजच्या सत्रात आपण एका बारबालाची माहिती जाणून घेणार आहोत. ही बारबाला इतकी प्रसिद्ध होती की, तिच्या नावाने संबंधित बार ओळखला जायचा. तिचं नृत्य, अदा आणि झलक पाहण्यासाठी सिनेसृष्टीतील दिग्गजांपासून, श्रीमंत व्यापारी ते मात्तबर गुन्हेगार अक्षरश: तडफडत असायची. तिच्यावर लाखो रुपयांच्या पैशांचा वर्षाव व्हायचा. ही बारबाला साधीसुधी बारबाला नव्हती. आयकर विभागाने तिच्या बंगल्यावर धाड टाकली तेव्हा तिच्या घरात पैशांचं त्या काळात अक्षरश: घबाड सापडलं होतं. आम्ही ज्या बारबालाची कथा सांगत आहोत तिचं नाव होतं तरन्नुम खान!

तेलगीने तिच्यावर 90 लाख एका रात्रीत उधळले

तरन्नुम खान आजही हयात असेल. पण ती आता कुठे आहे ते कुणालाच माहिती नाही. महाराष्ट्र सरकारने 2005 मध्ये डान्सबार बंदीचा कायदा पारित केला होता. त्यामुळे काही बारबालांनी इतर राज्यांमध्ये जाणं पसंत केलं होतं. तर तरन्नुम खान ही दुबईला गेल्याची चर्चा आहे. तिच्यावर आयकर विभागाने कडक कारवाई केली होती. तिची त्या काळातील ‘मुंबई मिरर’ची मुलाखत देखील प्रचंड गाजली होती. तसेच स्टॅम्पपेपर घोटाळ्याचा मास्टरमाईंट अब्दुल करीम तेलगी याने तिच्यावर एका रात्रीत उधळलेल्या 90 लाखांच्या नोटांमुळे देखील ती प्रसिद्धीच्या सर्वोच्च टोकावर पोहोचली होती. हीच तरन्नुम खान बारबाला नेमकी कशी झाली? यामागे एक दुखद आणि भावनिक इतिहास राहिलेला आहे.

Maharashtra TimesJenabai Daruwali : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम जिला आई मानायचा, जेनाबाई दारुवाली कोण होती?

1992-93 च्या दंगलीत घर जळालं

ज्येष्ठ पत्रकार एस. हुसेन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, तरन्नुम खान ही सर्वसामान्य घरातील होती. ती मुंबईच्या सायन येथे वास्तव्यास होती. तिने कम्प्युटर डिप्लोमाचे शिक्षण घेतलं होतं. पण तिचं हवाई सुंदरी बनण्याचं स्वप्न होतं. सर्व काही ठिक सुरु असताना अचानक 1992-93 च्या काळात मुंबईत हिंदू-मुस्लीम दंगल उसळली होती. या दंगलीत तरन्नून हिचं सायन येथील घर आगीत जळून खाक झालं होतं.

हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं

तरन्नुम हिच्यावर मोठं संकट कोसळलं होतं. घरात डायबिटीज आणि हृदयरोगाचा सामना करणारी आई होती. तर 17 वर्षांची तरन्नुम ही एकटी घराचा सांभाळ करायची. तिच्यावर आईच्या उपचाराची मोठी जाबबादारी होती. त्यामुळे या काळात तरन्नुम हाती मिळेल ते काम करु लागली. अशा या कठीण काळात तिचं हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न विरुन गेलं. ती मिळेल ते काम करत होती. पण त्यात फार कमी पैसे मिळत होते. या दरम्यान तिला बारबाला म्हणून काम करण्याची सूचना दिली. पैसे बरे मिळत असल्याने तिने बारबाला म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तिथे तिची लोकप्रियता गगनाला पोहोचली.

तरन्नुम प्रचंड श्रीमंत झाली

तरन्नुमने बारबाला म्हणून काम केल्यानंतर वर्षभरात तिच्या आर्थिक परिस्थितीत भरभराट आली. तिच्या नृत्य कलेमुळे तिला थेट दुबईतून कार्यक्रमाची ऑफर येऊ लागली. प्रचंड पैसा, महागडे गिफ्ट यामुळे तिच्या संपत्तीत वाढ झाली. याच काळात तरन्नुमने मुंबईच्या वर्सोवा येथे म्हाडाचा प्लॉट खरेदी केला. हा प्लॉट म्हाडाचा असला तरी अत्यंत श्रीमंत परिसरात होता. याच प्लॉटवर पुढे तिने बंगला बांधला आणि तिथे ती राहू लागली. तिने त्या बंगल्याचं ‘तनिष्क’ असं नाव ठेवलं होतं.

दीपा बार अँड रेस्टॉरंटला भरभराट

तरन्नूमची लोकप्रियता प्रचंड वाढलेली होती. श्रीमंत व्यापारी, हिरे व्यापारी, सिनेकलाकार असे अनेक जण तिला पाहण्यासाठी दीपा बार अँड रेस्टॉरंट येथे यायची. खरंतर दीपा बार अँड रेस्टॉरंट ही तिच्याचमुळे प्रसिद्धीच्या टोकावर पोहोचलं होतं. रात्रीचे नऊ वाजल्यानंतर दीपा बार अँड रेस्टॉरंटमध्ये तरन्नुमला पाहण्यासाठी श्रीमंत लोकांची अक्षरश: रांग लागायची. तरन्नुमला नृत्य कला देखील चांगली अवगत होती.

Maharashtra TimesMahalaxmi Papamani : साडीत 30 ते 40 लाख खोचून फिरायची, 90 च्या काळातील मुंबईतील मादक पदार्थ तस्करांची महाराणी कोण होती?

तरन्नुम मुंबईची जणू रातराणी बनली

तरन्नुमची लोकप्रियता एखादा बॉलिवूडच्या हिरोईनपेक्षा कमी नव्हती. ती एका दिवसाचे त्या काळात दीड ते दोन लाख रुपये कमवायची. त्या काळात संपूर्ण मुंबईवर हुकूमत गाजवणारी ती रातराणी मानली जायची, इतकी ती प्रसिद्ध झाली होती.

तरन्नुमच्या बंगल्यावर आयकर विभागाची धाड

तरन्नुमच्या नशिबाचे उलटे फासे 2005 मध्ये फिरले. आयकर विभागाने तिच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी काही गोष्टी अशा आढळल्या ज्यामुळे ती स्वत: तर गोत्यात आलीच, त्यासोबत जागतिक कीर्तीच्या काही क्रिकेट खेळाडूंची कारकीर्ददेखील धोक्यात आली.

डान्सबार बंदीचा कायदा

तरन्नुमने बारबाला म्हणून प्रचंड पैसा कमावला होता. पण 2005 मध्ये तत्कालीन महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यात डान्सबारवर बंदी आणली होती. डान्सबार समाजाला अपायकारक आहेत, असं म्हणत त्यांनी या निर्णयाला समर्थन दिलं होतं. या निर्णयामुळे इतर बारबालांनी गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील बारमध्ये जावून नोकरी करणं पसंत केलं. पण तरन्नूमला ते करायचं नव्हतं.

सट्टेबाजीत पैसा लावला

क्रिकेटच्या सट्टेबाजीमध्ये खूप पैसे मिळतात, अशी तरन्नुमला माहिती होती. काही अट्टल सट्टेबाज बुकी तिचे ग्राहक होते. त्यांच्याआधारे तिने सट्टेबाजीत पैसा लावण्यास सुरुवात केली. यामध्ये तिचं उत्पन्न तब्बल तीनपटीने वाढलं. पण असं असताना अचानक आयकर विभागाने तिच्या घरावर छापा टाकला.

रिटर्न का भरले नाही?

सगल चार वर्षांचा आयकर भरला नाही या कारणास्तव आयकर विभागाने तिच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात तिच्या घरात 22 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 8 लाख रुपयांचे दागिने सापडले. तसेच त्या काळात तिच्या बंगल्याची किंमत सव्वा करोड होती. तरन्नुमने त्यावेळी सीएवर खापर फोडलं.आपल्या सीएने योग्य मार्गदर्शन न केल्याने रिटर्न भरायचे राहिले असल्याचं तिने सांगितलं.

तरन्नुमला अटक

या दरम्यान तपासात तरन्नुमच्या मोबाईलमध्ये कुख्यात बुकी आणि आंतरराष्ट्रीय श्रीलंकेच्या खेळाडूंचे नंबर सापडले. यामुळे तपास अधिकाऱ्यांना तिच्यावरचा संशय बळावला. शेवटी तपासासाठी हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे सोपवले. या प्रकरणात अनेक बड्या खेळाडूंचे, बुकी आणि चित्रपट निर्मात्याचे नाव समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी तरन्नुमला अटक केली.

Maharashtra TimesMumbai Underworld : नवऱ्याचा बदला घेण्यासाठी शारजाह स्टेडियमध्ये दाऊदची फिल्डिंग, ऐनवेळी दगाफटका, मुंबईची लेडी डॉन सपना दिदी कोण?

तरन्नुम गायब, कुठे कुणालाच ठावूक नाही

तरन्नुम दोन महिने जेलमध्ये होती. तिला दोन महिन्यांनी जेलमधून जामीन मिळाला. पण तिची संपत्ती जप्त करण्यात आली होती. तिने 2008 मध्ये आपली संपत्ती परत मिळावी यासाठी कोर्टात अर्ज केल्याची माहिती देखील समोर आली होती. पण नंतर तिच्याबद्दल कोणतेही वृत्त वृत्तपत्रात समोर आले नाही. ती कुठे गेली, कुठे राहते? याची माहिती समजू शकली नाही. चर्चा अशीही असते की, ती आता दुबईत लोकांचे मनोरंजन करते. पण या केवळ चर्चा आहेत. खात्रीशीर माहिती नाही.