राजू शेट्टी यांनी साखरेच्या भाववाढीवरुन संताप व्यक्त केला आहे. त्यांनी साखरेच्या साठ्याबाबतची थेट आकडेवारी सांगत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोल्हापूर : राज्यात आणि देशात साखरेचे भाव कडाडले आहेत. साखरेच्या या भाववाढीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. “आज बाजारात जे साखरेचे दर कडाडले आहेत. ही अनैसर्गिक भाववाढ आहे. त्याला काहीही कारण नाही. कारण साधारणपणे मागणी आणि पुरवठ्याचे गुणोत्तर बिघडल्यावर भाव वाढतात किंवा कमी होतात”, असं राजू शेट्टी म्हणाले.
“आपली वर्षाची 270 ते 275 लाख टन इतकी साखरेची गरज आहे. प्रत्यक्षात गेल्यावर्षी साखर कारखान्यांचा सीजन सुरु झाला तेव्हा मागील वर्षाची 47 लाख टन साखर घेऊन सीजन सुरु झाला. वर्षभरात इथेनॉलचे उत्पादन घेऊन सुद्धा 291 लाख टन साखरेचं उत्पादन झालं. 291 अधिक 47 म्हणजे 338 लाख टन साखर या सीजनमध्ये आपल्याला उपलब्ध होती. त्या तुलनेने आपल्याला केवळ 270 लाख टनची आवश्यकता होती. 8 लाख टन साखर निर्यात झाली. 330 लाख टन साखर शिल्लक राहिली”, असं राजू शेट्टी म्हणाले.
राजू शेट्टी काय म्हणाले?
“आज अखेर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने साखरेचा कोटा रिलीज केला आहे, महिन्याला 22 लाख टन ते रिलीज करतात, त्यांनी 247 लाख टन रिलीज केला आहे. याचा अर्थ अजून 80 लाख टन साखर शिल्लक राहायला पाहिजे. पण आता सरकार म्हणत आहे की देशात केवळ 35 लाख टन साखर शिल्लक आहे. हे सर्व आकडे सरकारचेच आहे. सरकार आता म्हणतंय की 35 लाख टन साखर शिल्लक आहे.”
48 लाख टन साखर गेली कुठे? राजू शेट्टींचा सवाल
“एकूण साखरेपैकी केवळ 247 लाख टन साखर रिलीज केलेली आहे. निर्यात वजा जाता 83 लाख टन साखरपैकी 48 लाख टन साखर कुठे गेली? गायब झाली का? त्याच्या दोन शक्यता निर्माण होतात. एकतर जो कोठा होता त्यापेक्षा जास्त साखर काही कारखान्यांनी कमी दरामध्ये विकली आहे. काही व्यापाऱ्यांनी खरेदी करुन आपल्याकडे ठेवली आहे. कारण अनेक साखर कारखानदार हेच व्यापारी आहेत हे लक्षात घ्या.”
“शेतकऱ्यांना चुना लावण्याचा उद्योग केलेला आहे. जी साखर 3600 आणि 3700 रुपये क्विंटलने खरेदी केली, ती आज ते 6500 रुपये क्विंटलने विकायला लागले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्याचं काम केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचं असताना, त्यांनी यामध्ये काहीच केलं नाही.”
इतर राज्यांची साखर गेली कुठे? राजू शेट्टी यांचा सवाल
“देशामध्ये 35 लाख टन साखर शिल्लक आहे, असं केंद्र सरकार म्हणत आहे. त्यातील 25 लाख टन साखर ही केवळ महाराष्ट्रातच आहे. मग उत्तर प्रदेशची साखर कुठे गेली? पंजाब-हरियाणाची साखर कुठे गेली? पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूची साखर कुठे गेली? आंध्र प्रदेशची साखर कुठे गेली? याचा अर्थ महाराष्ट्र वगळता इतर राज्याच्या कारखान्यांनी नियम पाळला नाही. त्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला गेला नाही.”
बाहेरच्या देशात साखर विकली गेल्याचा आरोप
“48 लाख टन पैकी काही काही साखर व्यापाऱ्यांनी खरेदी करुन दाबून ठेवली आहे. ती साखर आता चढ्या दराने विकून पैसा कमवत आहेत. काही साखर तीन महिन्यापूर्वी सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली ती बंदी तोडून शेजारी राष्ट्रांबरोबर आपले खुल्या व्यापाराचे करार आहेत, त्याचा गैरफायदा घेऊन बाहेरच्या देशात साखर विक्री केली आहे.”
राजू शेट्टी यांचे गृहमंत्र्यांना सवाल
“अशावेळी बाहेरच्या देशात साखर जात असताना आमच्या देशाचे गृहमंत्री काय करत होते? त्यांची गृह खात्याची काही जबाबदारी होती की नाही? 48 लाख टन म्हणजे जवळपास 3 लाख ट्रक विदेशात गेल्या. अशावेळी गृहखातं काय करत होतं? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.”
Mahalaxmi Papamani : साडीत 30 ते 40 लाख खोचून फिरायची, 90 च्या काळातील मुंबईतील मादक पदार्थ तस्करांची महाराणी कोण होती?
‘केंद्र सरकारला जबाबदारी टाळता येणार नाही’
“केंद्र सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. इथेनॉलमुळे साखर कमी पडलेली नाही, कारण असं झालं असतं तर साखर जास्त उत्पादन झाली असती, आणि साखरेचे भाव पडले असते. साखर वाढली की गुळाचे भाव आपोआप वाढतात. त्यामुळे गुळाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे, गुळ दरावर देखील या सगळ्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आयात केलेली साखर 15 ऑक्टोबरच्या आत येणार नाही. 15 सप्टेंबरपासून देशातील काही कारखाने सुरू होणार असल्यामुळे, साखर आयात करण्याचा सरकारचा निर्णय मूर्खपणाचा आहे, याचा फटका पुन्हा शेतकऱ्यांना बसणार आहे.”
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा