• Tue. Aug 25th, 2026

छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद पोलिसांनी केवळ बसच्या तिकीटीच्या आधारावर महिलेची दागिन्यांची पर्स शोधून काढली आहे. तसेच पोलिसांनी गर्दीत हरवलेल्या 10 लहान मुलांना शोधून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलं आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिर परिसर आणि हजरत जर जारी बक्ष उरुसानिमित्त खुलताबाद येथे भाविकांचा अथांग जनसागर उसळला होता. या गर्दीत दिल्लीहून आलेल्या एका महिला भाविक 1.65 लाखांची सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स एसटी बसमध्ये विसरली. मात्र, खुलताबाद पोलिसांनी केवळ तिकिटाचा धागा पकडत अवघ्या काही तासांत पर्स शोधून दिली. यासोबतच घृष्णेश्वर मंदिर आणि उरूस गर्दीत ताटातूट झालेल्या 10 लहान बालकांना आणि एका वयोवृद्धाला सुखरूप नातेवाईकांच्या स्वाधीन करत पोलिसांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नेमकं काय घडलं?

दिल्लीतील पहाडगंज येथील रहिवासी श्रीमती कोमल राणा या श्रावणी सोमवाराच्या पवित्र मुहूर्तावर श्री घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन आटोपून गर्दीतून प्रवास करताना त्यांची 15 हजार रुपये रोख आणि 1 लाख 50 हजारांचे सोन्याचे दागिने असलेली पर्स बसमध्येच राहून गेली.

पोलिसांनी पर्स कशी शोधली?

बसचा क्रमांक किंवा चालकाची कोणतीही माहिती नसताना हवालदिल झालेल्या कोमल यांनी खुलताबाद पोलीस मदत केंद्रात धाव घेतली. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांनी महिलेकडील एसटी तिकिटावरून बसची वेळ आणि मार्ग निश्चित केला.

सदर बस घृष्णेश्वर मंदिर परिसर सोडल्यानंतर कन्नडच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी तातडीने संपर्क साधला. बसमधील कर्तव्यावर असलेल्या होमगार्डने सतर्कता दाखवत बस थेट पोलीस ठाण्यात घेतली. खात्री केल्यानंतर 15 हजारांची रोकड आणि 1.50 लाखांचे सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचे आढळल्याने पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल श्रीमती कोमल राणा यांच्या स्वाधीन केला.

घृष्णेश्वर मंदिर गर्दीत हरवलेली 10 बालके पालकांच्या स्वाधीन

श्रावणी सोमवारी श्री घृष्णेश्वर मंदिर आणि उरुसाच्या प्रचंड गर्दीत स्वतःच्या कुटुंबापासून ताटातूट झालेली 10 लहान बालके आणि 1 वयोवृद्ध नागरिक (एकूण 11 जण) बंदोबस्तावरील पोलिसांना आढळले. हवालदिल झालेल्या या लहान मुलांचा पोलिसांनी तातडीने शोध घेऊन सर्वांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि त्यांच्या पथकाने घृष्णेश्वर मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. लाखो भाविकांची उपस्थिती असूनही संपूर्ण दर्शन सोहळा आणि उत्सव शांततेत पार पडला.