म. टा. प्रतिनिधी, पुणे: काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमासाठी पुण्यात विद्यार्थिनी-युवतींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. काहींनी तिरंग्याचे टॅटू रंगवले होते. काहींनी हाती तिरंगा घेतला होता. काहींच्या हातात राहुल गांधी यांचे पोस्टर्स आणि त्यांना पाठिंबा देणारा मजकूर असलेले फलकही होते. सुरुवातीला रॉक-हिपहॉप, रॅप आणि बॉलिवूडमधील विविध प्रसिद्ध गाण्यांचा बँडच्या तालावर कलाकारांनी सादरीकरण केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. या कार्यक्रमावरून राजकीय कलगीतुरा रंगल्याचेही पाहायला मिळाले. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मेट्रो थांबवून ठेवल्याचा आरोप केला. त्यानंतर मेट्रो प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले.
‘आरटीओ पुणे’ स्टेशनवर मेट्रो थांबवून ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. मात्र “शनिवारी पुणे मेट्रोच्या सेवेमध्ये कोणताही खंड पडलेला नाही किंवा सेवा बंद करण्यात आलेली नाही. संध्याकाळी ‘एआयएसएसएमएस’ कॉलेज येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी ‘आरटीओ पुणे’ या मेट्रो स्थानकात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन रामवाडी ते वनाझ या मार्गासाठी मेट्रोकडून दोन अतिरिक्त ट्रेनची सोय करण्यात आली होती. या दोन्ही ट्रेन ‘आरटीओ पुणे’ या स्थानकाच्या जवळ अतिरिक्त मेट्रो मार्गावर उभ्या करण्यात आल्या होत्या,” असे ‘महामेट्रो’तर्फे स्पष्ट करण्यात आले.
राहुल गांधींच्या कार्यक्रमाची चर्चा
बरोबर साडेसात वाजता पिवळा फुल शर्ट घातलेल्या राहुल गांधी यांचे मंचावर आगमन होताच टाळ्यांच्या आणि ‘राहुल…राहुल’ अशा घोषणांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. ‘पुण्यातील या छान स्वागतासाठी धन्यवाद. आज मी तुम्हाला ‘लेक्चर’ देण्यासाठी किंवा राजकारणावर बोलण्यासाठी नव्हे, तर तुम्हाला व्यक्त होण्याची संधी देण्यासाठी, तुमचे विचार जाणून घेण्यासाठी आलो आहे,’ अशा शब्दात गांधी यांनी युवतींना साद घालून सादरीकरणाच्या साह्याने आपले मुद्दे मांडले.
या प्रश्नांवर चर्चा…
काही विद्यार्थिनी आणि युवतींना मंचावर बोलावून घेऊन यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत राहुल गांधी म्हणाले, ‘हिंसाचार, अपमानास्पद वागणूक, नियंत्रित करण्याचा दबाव मुलींवर नेहमी टाकला जातो. दर वर्षी जन्माला येण्यापूर्वी साडेचार लाख मुलींना मारले जाते, ८० टक्के महिलांचा कधी ना कधी विनयभंग होतो, ३० टक्के महिलांवर कौटुंबिक हिंसाचार होतो, तर १०० पैकी सहा महिलांवर बलात्कार होतो. ५० टक्के महिला हिंसाचारातून वाचण्यासाठी शिक्षण बंद करून घरी बसतात. महिलांना केवळ सुरक्षिततेसाठी वार्षिक साडेसतरा हजार रुपये अधिक खर्च करावे लागतात.’
‘६० टक्के मुली एकट्या घराबाहेर पडत नाहीत. ४५ टक्के युवती लग्नासाठी किंवा घर सांभाळण्यासाठी शिक्षण वा नोकरी सोडतात. केवळ आठ टक्के महिलांकडेच स्वतःची स्वतंत्र मालमत्ता आहे. मुलींना कोणते काम करताना कोणाची तरी परवानगी घ्यावी लागते. मुली कुठे काम करताना त्यांना पुरुषांपेक्षा २५ टक्के पगार कमी मिळतो हे भेदभावाचे लक्षण आहे. १५ ते २९ वर्षातील मुलींना घरात रोज पाच ते सहा कामे करावी लागतात. त्याप्रमाणात मुले केवळ अर्धा तास काम करतात,’ याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.
‘मलाही शिव्याच…’
सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविला, तर शिव्या दिल्या जातात, असे सांगून एका तरुणीने पाच वर्षांपासून शिव्या दिल्या जात असल्याचे सांगितले. त्यावर क्षणाचा विलंब न करता मला पण वर्षानुवर्षे शिव्याच देत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
सुविधांची वानवा
चार-पाच वाजल्यापासून विद्यार्थिनी कार्यक्रमस्थळी उपस्थित होत्या. त्यांच्यासाठी; तसेच देशभरातून आलेल्या पत्रकारांसाठी खुर्च्यांची व्यवस्था नव्हती. त्यांना तीन ते चार तास उभेच राहावे लागले. त्यामुळे काही विद्यार्थिनी चक्कर येऊन पडल्या. याउलट काँग्रेसची नेतेमंडळी खुर्चीत बसून होती. त्यांच्यासाठी खास खानपान व्यवस्थाही करण्यात आली होती.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा