• Mon. Aug 24th, 2026

Sanjay Raut: भाजप अस्वस्थ, मोदी-शाह यांना विरोधी बाकांवर बसावं लागेल; राहुल गांधींच्या एण्ट्रीआधी पुण्यातून संजय राऊतांचा हल्लाबोल

​पुणे : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यात आयोजित ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद मेळाव्यासाठी राहुल गांधी उपस्थित राहत असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका केली आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून लवकरच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये विरोधकांच्या बाकांवर बसावे लागेल, अशी टीका राऊतांनी केली आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपला राजकीय समीकरणांची आठवण करून दिली. राहुल गांधी जेव्हा राजकारणात आले, तेव्हापासून त्यांच्या क्षमतेवर आपला ठाम विश्वास होता. सुरुवातीला जेव्हा अनेकांनी राहुल गांधींची खिल्ली उडवत त्यांना ‘पप्पू’ म्हणून हिणवले, तेव्हा हाच नेता भविष्यात देशाचे नेतृत्व करेल, अशी भूमिका मांडणारा मी पहिला व्यक्ती होतो, असे राऊत यांनी नमूद केले.

केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधताना संजय राऊत म्हणाले की, सत्ता गमावण्याच्या भीतीने भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या पडझडीची प्रक्रिया सुरू होईल. राहुल गांधी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि जनसमर्थनामुळे सत्ताधाऱ्यांचे चेहरे भयभीत झाले आहेत. संसदेबाहेरील आंदोलनात संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन पॅलेट गन प्रकरणात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंदवायला लावून राहुल गांधींनी सरकारला माघार घेण्यास भाग पाडल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

राहुल गांधी यांच्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांनी तब्बल ३० अटी लादल्याच्या मुद्द्यावर राऊतांनी तीव्र आक्षेप घेतला. राहुल गांधी हे देशाच्या संसदेतील अधिकृत विरोधी पक्षनेते आणि या देशाचे जबाबदार नागरिक आहेत, ते काही परदेशातून आलेले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. पुण्यात जेव्हा अमित शाह किंवा भाजपचे अन्य ज्येष्ठ नेते येतात, तेव्हा प्रशासनाकडून अशा प्रकारच्या जाचक अटी लादल्या जातात का, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.