• Mon. Aug 24th, 2026

Mumbai Couple Break Up : सोहमचे मित्र घरी आल्याचे कळताच तरुणीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. सोहमच्या घरामध्ये पार्टी सुरू असून तिथे भलते उद्योग सुरु असल्याची माहिती तिने दिली. यावेळी पोलिसांनी छापा टाकताच मोठा उलगडा झाला

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : साकीनाका येथील तरुणाचे सोशल मीडियावरून एका तरुणीसोबत मैत्री झाली, प्रेम जुळले. प्रेमप्रकरण सुरू असतानाच प्रेयसी नको नको ते हट्ट करू लागली आणि हट्ट न पुरविल्यास डोके आपटून घेणे, नस कापणे अशा कृती करू लागली. तिचा हट्टीपणा कमी करण्यासाठी तरुणाने तिच्याशी साखरपुडाही केला. मात्र त्यानंतर तिचा हट्टीपणा कमी होण्याऐवजी अधिकच वाढला. त्यामुळे त्याने लग्नच मोडले. याचा धडा शिकविण्यासाठी तरुणीने त्याच्या घरी पोलिसांना छापा टाकण्यास लावले. मात्र तिने दिलेली माहिती खोटी असल्याचे कळताच पोलिसांनी तिच्याविरुद्धच गुन्हा दाखल केला.

हट्टीपणा कमी करण्यासाठी साखरपुडा

मूळचा बिकानेर येथील असलेला सोहम (बदललेले नाव) साकीनाका येथे वास्तव्यास आहे. सोशल मीडियावरून त्याची ओळख तेलंगण येथील दीक्षिता (बदललेले नाव) हिच्यासोबत झाली. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र तिचा स्वभाव फारच हिंसक असल्याचे सोहम याच्या लक्षात आले. दीक्षिता काहीही हट्ट करू लागली, हे हट्ट न पुरविल्यास जीव देण्याची धमकी देऊ लागली. तिचा हट्टीपणा लग्नानंतर तरी कमी होईल, असा विचार करून दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने सोहम याने तिच्यासोबत लग्न करण्याचे ठरवले. २०२४ मध्ये दिल्ली येथील एका हॉलमध्ये त्यांचा साखरपुडा झाला.

मित्रांना हाकलून दिल्याने संताप

साखरपुडा झाल्यानंतर दीक्षिता हिचा हट्टीपणा अधिकच वाढला. जून २०२६ मध्ये सोहमचे मित्र त्याच्या घरी आले होते. हे कळताच दीक्षिता हिने त्यांना जबरदस्तीने हाकलून दिले. त्यावेळी सोहमने दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने लग्न मोडले. मात्र याचा दीक्षिताच्या मनात राग होता.

ड्रग्ज पार्टीचा खोटा फोन

१३ ऑगस्टला सोहमचे काही मित्र घरी आल्याचे कळताच तिने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. सोहम याच्या घरामध्ये पार्टी सुरू असून अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची माहिती तिने दिली. शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी सोहमच्या घरी छापा टाकला. मात्र तपासणीत काहीच आढळले नाही. त्यानंतर दीक्षिता हिने खोटी माहिती दिल्याचे समजले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा