• Sat. Aug 22nd, 2026

एआयच्या माध्यमातून महिलांनी सक्षमीकरणाची नवी संधी साधावी – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 22, 2026

छत्रपती संभाजीनगर, दि. २२ : एआयच्या माध्यमातून महिलांना शिक्षण, रोजगार, व्यवसाय व दैनंदिन जीवनात प्रगती करण्यासाठी नवी साधने उपलब्ध होत आहेत. महिलांनी एआयचे स्वरूप समजून घेऊन त्याचा योग्य वापर करावा. उपलब्ध संधींचा लाभ घेऊन एआयला सक्षमीकरणाचे साधन बनवावे, असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.

राष्ट्रीय महिला आयोग व राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘यशोदा एआय’ उपक्रमांतर्गत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महिला’ या विषयावरील क्षमता बांधणी कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य सचिव सुदीप जैन, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., राज्य महिला आयोगाच्या सदस्या सचिव नंदिनी आवाडे, राष्ट्रीय महिला आयोगाचे संचालक राम अवतार सिंह, उपसचिव डॉ. पद्मश्री बेनाडे, उपायुक्त कृष्णा राठोड, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी कोमल कोरे, व्याख्याते उन्मेष जोशी, स्मिता कासार आदी उपस्थित होते.

श्रीमती विजया रहाटकर म्हणाल्या, कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्याची बाब नसून वर्तमानातील गरज आहे. महिलांचे डिजिटल सक्षमीकरण, सुरक्षितता व आत्मविश्वास वाढविणे हा ‘यशोदा एआय’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. माहिती संकलन व विश्लेषण, आरोग्य सेवा, तपास प्रक्रिया तसेच दैनंदिन प्रशासकीय कामांना एआयमुळे गती मिळू शकते. कामाच्या स्वरूपानुसार एआयचा योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे.

महिला उद्योजक व बचत गटातील महिलांनीही एआयचा उपयोग व्यवसायवृद्धीसाठी करावा, व्यवसायासाठी प्रभावी संदेश तयार करणे, समाजमाध्यमांवर प्रचार करणे तसेच व्यवसायाशी संबंधित सर्जनशील साहित्य तयार करण्यासाठी एआयची मदत घेता येते. महिलांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती असणे आवश्यक असून बालविवाह आणि कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ यांसारख्या समस्यांविरोधात संघटितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

गृहिणींच्या दैनंदिन कामातही एआय उपयुक्त ठरू शकतो, मुलांना अभ्यासातील अवघड विषय सोप्या पद्धतीने समजावून घेण्यासाठी, घरातील कामांचे नियोजन करण्यासाठी तसेच विविध माहिती मिळविण्यासाठी एआयचा वापर करता येतो. एआयचा वापर करताना स्वतःची विचारशक्ती कायम ठेवावी, गोपनीयतेचे संरक्षण करावे व तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल सुरक्षिततेबाबत महिलांनी अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. छायाचित्रांमध्ये फेरफार, डीपफेक, आवाजाची नक्कल, ऑनलाइन फसवणूक, सायबर छळ, बनावट खाती आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर यांपासून सावध राहण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रत्येक महिलेला कृत्रिम बुद्धिमत्तेची मूलभूत माहिती असणे हे आता जीवनकौशल्याचा एक भाग बनले आहे. ‘एआय सखी’च्या माध्यमातून एक महिला एआय शिकून इतर महिलांना त्याचे ज्ञान देईल आणि अशा प्रकारे डिजिटल सक्षमीकरणाची साखळी देशभर निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री. जैन म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार संगणकाच्या तुलनेत अत्यंत वेगाने होत आहे. संगणकाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनण्यासाठी २० ते ३० वर्षे लागली होती, तर कृत्रिम बुद्धिमत्तेने अल्पावधीतच आपल्या जीवनावर प्रभाव निर्माण केला आहे. या तंत्रज्ञानातील धोके समजून घेऊन सुरक्षिततेची काळजी घेणे, विशेषतः महिलांनी सायबर तंत्रज्ञानाची माहिती घेऊन सक्षम होणे गरजेचे आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून हुबेहूब आवाज व चित्रफिती तयार करून फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे अशा आवाजावर किंवा चित्रफितीवर तत्काळ विश्वास न ठेवता त्याची खात्री करणे आवश्यक आहे. आभासी जगातील सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी तंत्रज्ञानाची माहिती व आवश्यक दक्षता महत्त्वाची आहे. ‘यशोदा एआय’ उपक्रमातील मार्गदर्शन महिलांना सक्षम करण्यास उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.

श्री. येडगे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे साधन आहे. त्याचा उपयोग दैनंदिन कामे सुलभ करण्याबरोबरच महिला सुरक्षेसाठीही करता येऊ शकतो. तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध असून कृत्रिम बुद्धिमत्ता सहज वापरता येणारे तंत्रज्ञान आहे. त्यामुळे महिलांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा आत्मविश्वासाने वापर करून स्वतःला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सक्षम करावे.

यावेळी महिलांनी दैनंदिन वापरात एआयचा कसा उपयोग करायचा, याविषयी स्मिता कासार तसेच सायबर सुरक्षा विषयावर उन्मेष जोशी, ‘पॉश’ जनजागृती विषयावर दिपाली श्रीवास्तव आणि डिजिटल मार्केटिंग विषयावर शिवम गर्ग यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed