• Sun. Aug 23rd, 2026

महाराष्ट्र–हॅसेन राज्याने व्यवसाय, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील सहकार्य वाढवावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 22, 2026

मुंबई ,दि. २१ : महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हॅसेन राज्यांनी आर्थिक, तांत्रिक आणि नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्य वाढवावे असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. तसेच मुंबई-फ्रँकफर्ट आणि महाराष्ट्र-हॅसेन यांच्यातील सहकार्यामुळे उद्योग, गुंतवणूक, संशोधन आणि जागतिक व्यापाराच्या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

पारटेक्स एआयच्या वतीने मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे आयोजित ‘महाराष्ट्र-हॅसेन आर्थिक व तंत्रज्ञान संवाद’ कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. हॅसेन राज्याचे मंत्री-अध्यक्ष (मुख्यमंत्री) बोरीस ऱ्हेइन यावेळी उपस्थित होते. राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, फ्रँकफर्ट हे हॅसेन मधील मोठे शहर जर्मनीचे आर्थिक केंद्र तसेच युरोपमधील प्रमुख वित्तीय केंद्रांपैकी एक आहे. त्याचप्रमाणे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून देशातील प्रमुख बँका, भांडवली बाजार, कॉर्पोरेट मुख्यालये आणि गुंतवणूकदारांचे केंद्र येथे आहे. त्यामुळे फ्रँकफर्टला मुंबईशी आणि हॅसेनला महाराष्ट्राशी जोडणे उभयपक्षी लाभाचे ठरेल. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही भारतातील सर्वांत मोठी राज्य अर्थव्यवस्था असून महाराष्ट्राचा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात सुमारे १३.५ टक्के, औद्योगिक उत्पादनात १५.५ टक्के, तर देशाच्या निर्यातीत सुमारे १५ टक्के वाटा आहे. २००० ते २०२५ या कालावधीत भारतात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी सुमारे ३१ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली असल्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी जर्मन शिष्टमंडळाला सांगितले.

महाराष्ट्रात मोठी बाजारपेठ, विविध क्षेत्रांमध्ये विस्तारलेला औद्योगिक पाया, भांडवल, तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ, संशोधन संस्था, पायाभूत सुविधा आणि जागतिक संपर्क व्यवस्था उपलब्ध आहे. महाराष्ट्राची सुमारे १३ कोटी लोकसंख्या ही जगातील अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. राज्यात दरवर्षी मोठ्या संख्येने अभियंते, डॉक्टर, तंत्रज्ञ आणि कुशल व्यावसायिक तयार होतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी महाराष्ट्राकडे मोठी क्षमता आहे. असेही राज्यपाल म्हणाले. सहकार्याच्या संधी केवळ वाहन उद्योगापुरत्या मर्यादित नसून औषधीनिर्माण आणि जीवनविज्ञान क्षेत्रातही मोठ्या संधी असल्याचे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख औषधनिर्मिती आणि जीवनविज्ञान केंद्रांपैकी एक असून, औषधनिर्मिती आणि निर्यातीत राज्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. राज्यात अनेक एफडीए -मान्यताप्राप्त उत्पादन प्रकल्प तसेच जागतिक कंपन्या कार्यरत आहेत.

हॅसेनची औषधनिर्मिती, रसायने, जैवतंत्रज्ञान आणि वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षमता आणि महाराष्ट्राची उत्पादनक्षमता, कुशल मनुष्यबळ व मोठी बाजारपेठ यांच्यात नैसर्गिक पूरकता असल्याचे राज्यपालांनी सांगितले. दोन्ही प्रदेशांनी संयुक्त संशोधन, जैवतंत्रज्ञान, वैद्यकीय उपकरणे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आरोग्यसेवा आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये समावेश केला जात असून आंतरराष्ट्रीय सहकार्यही वाढवले जात असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष सहकार्यावर भर देताना ते म्हणाले की, हॅसेनमधील एखाद्या औद्योगिक कंपनीने महाराष्ट्रातील एआय कंपनीसोबत काम करून आपल्या कारखान्याची कार्यक्षमता वाढवावी आणि जर्मन अभियांत्रिकी कंपनीने पुण्यात संशोधन व विकास केंद्र स्थापन करून जर्मन क्षेत्रीय कौशल्य आणि भारतीय अभियांत्रिकी प्रतिभेचा संगम घडवावा, अशी भागीदारी निर्माण झाली पाहिजे. महाराष्ट्र–हॅसेन आर्थिक व तंत्रज्ञान संवादातून नवोन्मेष, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि सामायिक आर्थिक विकासावर आधारित भागीदारीची नवी पिढी निर्माण होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

UPI क्रांतीचे हॅसेनच्या मंत्री-अध्यक्षांकडून कौतुक

हॅसेनचे मंत्री-अध्यक्ष बोरीस ऱ्हेइन यांनी भारतातील यूपीआय व्यवहारांच्या क्रांतीचे कौतुक केले. हॅसेनमध्ये सुमारे ४० हजार भारतीय नागरिकांचा समुदाय असून, हा समुदाय हॅसेनच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले. पारटेक्स एआयचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सहसंस्थापक गौरव त्रिपाठी यांनी हॅसेनमध्ये काम करण्याच्या आपल्या अनुभवांची माहिती दिली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि हॅसेनचे मंत्री-अध्यक्ष बोरीस ऱ्हेइन यांनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला भेट देऊन तेथील कार्यपद्धतीची माहिती घेतली.

00000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed