• Sun. Aug 23rd, 2026

Chhatrapati Sambhajinagar: आयफोन नव्हे, ६ वर्षांपूर्वीची ती एक घटना मृत्यूला कारणीभूत? चांदगुडे कुटुंबात नक्की काय सुरू होतं? नातेवाईकांच्या चर्चेने वेगळी कलाटणी

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर आई-वडिलांसह कुणाल चांदगुडे या तरुणाने दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या हृदयद्रावक घटनेत आता एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही आत्महत्या केवळ आयफोनच्या वादातून झाली नसून, या कुटुंबात गेल्या ६ वर्षांपासून सतत कौटुंबिक कलह सुरू असल्याची माहिती घाटी रुग्णालयात जमलेल्या नातेवाईकांकडून समोर आली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी कुणाल मुरलीधर चादगुडे (वय १९) याने आत्महत्या केली असून वडील मुरलीधर दामोधर चांदगुडे (वय ४८) व आई संगीता मुरलीधर चांदगुडे (वय ४२, रा. अक्षयबन सोसायटीसमोर, झाल्टा फाटा, ता. छत्रपती संभाजीनगर, मूळ रा. कर्जत पिंपळगाव, ता. अंबड, जि. जालना) असे डोंगरावरून दरीत पडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मुरलीधर व संगीता चांदगुडे यांना दोन मुले होती. मुरलीधर हे व्यवसायाने ट्रकचालक होते, तर संगीता गृहिणी होत्या. ६ वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचा एका आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि तेव्हापासूनच घरात सतत खटके उडू लागले होते. घरातील याच वाद-विवादांमुळे आणि मानसिक तणावामुळे मुरलीधर हे कामाच्या निमित्ताने का होईना, सातत्याने घराबाहेर राहू लागले. ते गेल्या ३ महिन्यांपासून बाहेरगावीच होते. दोन दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते; मात्र घरी आल्यानंतर पुन्हा त्यांच्यात आणि कुणालमध्ये खटके उडाले होते, असं नातेवाईकांकडून बोललं जात आहे.

तणावाचे कारण जुनेच?

यापूर्वी सोशल मीडियावर कुणालने आयफोन आणि मोबाईलच्या हप्त्यांवरून आलेल्या रागातून आत्महत्या केल्याचा दावा केला जात होता. मात्र, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी आधीच या आयफोनच्या अफवेचे खंडन केले होते. ६ वर्षांपूर्वी मोठ्या भावाचा झालेला मृत्यू, कौटुंबिक तणाव आणि ३ महिन्यांनंतर घरी परतलेल्या वडिलांशी झालेला वाद, या सर्व जुन्या व नव्या कारणांच्या एकत्रित तणावातूनच कुणालने हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आता व्यक्त होत आहे.​

दरम्यान, दुर्दैवाने, या घटनेत आई, वडील आणि मुलगा अशा तिघांचाही करुण अंत झाल्यामुळे घरातील खरी वस्तुस्थिती सांगण्यासाठी आता कोणताही साक्षीदार शिल्लक राहिलेला नाही.