• Thu. Aug 20th, 2026

Crime News : महिलेला 2 लाखांचे लोनचे आमिष दिले, बाईकवर निर्जनस्थळी नेले, दागिने लुटले, पोलिसांना खबर, सिनेस्टाईल नांग्या ठेचल्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला 2 लाखांचे लोनचे आमिष देऊन आरोपीने फसवणूक केली. त्याने महिलेचे दागिने लुटले. यावेळी त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपीच्या सिनेस्टाईल मुसक्या आवळल्या आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : दोन लाख रुपयांचे लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणाऱ्या आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भामट्याला हरसूल पोलीस ठाण्याच्या विशेष शोध पथकाने अवघ्या काही तासांत अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 8 लाख 18 हजार 700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि एक मोटार सायकल जप्त केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

नागोराव सुखदेव श्रीराम (वय 30, रा. हनकदरी, ता. शेनगाव, जि. हिंगोली; सध्या रा. एसटी कॉलनी, सुरेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन रामदास औटी (वय 46, रा. गुरुचरण रेसिडेन्सी, हरसूल) या गृहिणी 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उभ्या असताना, आरोपी नागोराव श्रीराम याने त्यांना दोन लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

त्यानंतर त्याने महिलेला स्वतःच्या दुचाकीवर बसवून तिसगाव रस्त्यावरील एका निर्जन शेतात नेले. तिथे महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन, फसवणूक करून तिच्या जवळील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले आणि तिथून पळ काढला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन किलोमीटर पाठलाग करून आरोपीला पकडले

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध पथक पोलीस उपनिरीक्षक रफीक शेख, अंमलदार सुभाष शेवाळे, फिरोज तडवी, आकाश जायभाये, पोलीस अमंलदार सिंगल आणि महिला पोलीस अंमलदार निर्मला कोलते यांनी तपास सुरू केला.

आरोपी सुरेवाडी भागातील एसटी कॉलनीत आला असून तो परगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचला असता, आरोपी पोलिसांना चकवा देऊन पळून जाऊ लागला. मात्र, अंमलदारांनी तब्बल 2 किलोमीटर पाठलाग करून आरोपीला अतिशय शिताफीने ताब्यात घेतले.

8 लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त; दुसरा गुन्हासुद्धा उघड

न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी दरम्यान कसून चौकशी केली असता, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 1 लाख 30 हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस (10 ग्रॅम) आणि 6 लाख 24 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण (4 तोळे 8 ग्रॅम) तसेच 40 हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटार सायकल (MH 20 CJ 0178) जप्त करण्यात आली आहे.

आरोपीने पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडको पुलाजवळून एका महिलेला दुचाकीवर बसवून अयोध्यानगर-कर्णपुरा भागातील निर्जन स्थळी नेऊन तिच्या कानातील सोन्याचे रिंग जबरदस्तीने हिसकावून घेतले होते. या गुन्ह्यातील 26 हजार रुपये किमतीचे सोन्याचे रिंगही पोलिसांनी जप्त केले आहे.