• Wed. Aug 19th, 2026

Thane News : 12 वर्षीय मुलाचा मेंदूचा चुकीचा एमआरआय अहवाल, कळव्यातील शासकीय रुग्णालयात भयंकर निष्काळजीपणा

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयात 12 वर्षीय मुलाच्या मेंदूचा चुकीचा एमआयआर अहवाल देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका १२ वर्षीय निष्पाप मुलाच्या मेंदूचा चुकीचा एमआरआय अहवाल दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या या गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक पवित्रा घेत संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत रुग्णालय प्रशासनाने पीपीपी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ‘मेसर्स कृष्णा डायग्नोस्टिक्स प्रा. लि.’ला चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे कडक स्मरणपत्र बजावले आहे.

नेमकं प्रकरण काय?

श्लोक एलिस (वय १२ वर्षे) या बालकाला उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २१ जुलै २०२६ रोजी रुग्णालयातील कृष्णा डायग्नोस्टिक्स सेंटरमध्ये त्याच्या मेंदूची एमआरआय तपासणी झाली. या तपासणीनंतर कृष्णा डायग्नोस्टिक्सने दिलेल्या अहवालात मुलाच्या मेंदूमध्ये गंभीर दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले.

दोन दिवसात वेगवेगळे अहवाल

अहवाल पाहून हादरलेल्या पालकांनी तातडीने दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि केवळ दोन दिवसांत मुलाची पुन्हा नव्याने एमआरआय चाचणी केली. धक्कादायक बाब म्हणजे, दुसऱ्या तपासणीत मुलाच्या मेंदूला कसलीही दुखापत नसल्याचे निष्पन्न झाले. अवघ्या दोन दिवसांत आलेल्या दोन वेगवेगळ्या अहवालांमुळे निष्पाप मुलाचे पालक प्रचंड मानसिक तणाव आणि भीतीच्या छायेत गेले.

मनविसे आक्रमक

रुग्णांची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या या गंभीर प्रकाराविरोधात मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे आणि कल्याण शहराध्यक्ष अंकुश राजपूत यांनी ४ ऑगस्ट २०२६ रोजी ठाणे महापालिकेचे आरोग्य उपायुक्त तसेच रुग्णालय अधिष्ठाता यांच्याकडे लेखी तक्रार केली. निष्पाप बालकाच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि रुग्णांची फसवणूक करणाऱ्या कृष्णा डायग्नोस्टिक्सच्या व्यवस्थापकावर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करत मनविसेने दोन्ही एमआरआय चाचण्यांचे अहवाल पुरावा म्हणून प्रशासनासमोर सादर केले.

चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

मनविसेच्या तक्रारीनंतर खडबडून जागी झालेल्या रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी पावले उचलली आहेत. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी करून कृष्णा डायग्नोस्टिक्सला या प्रकरणाची तत्काळ सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणातील पुढील कारवाईचा अहवाल वेळोवेळी कळवण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोषींवर प्रशासन नेमकी काय कठोर कारवाई करते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे, मनविसे मागणी

“कळवा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी अशाप्रकारे खेळणे अत्यंत अक्षम्य आणि संतापजनक आहे. एका निष्पाप १२ वर्षीय बालकाच्या मेंदूचा चुकीचा एमआरआय अहवाल देणे म्हणजे थेट त्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करण्यासारखेच आहे. ‘कृष्णा डायग्नोस्टिक्स’च्या या निष्काळजीपणावर केवळ कागदी चौकशी करून चालणार नाही, तर संबंधित व्यवस्थापनावर तात्काळ कठोर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे. जोपर्यंत दोषींवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत मनविसे हा लढा सुरूच राहील”, अशी प्रतिक्रिया मनविसेचे सरचिटणीस संदीप दिनकर पाचंगे यांनी दिली.