सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण २ कोटी ७ लाख ९३ हजार ९१६ अर्ज अद्याप संकलित झाले नसल्याचे कळते. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यात ६०.९२ टक्के, मुंबई शहरात ६२.३८ टक्के, मुंबई उपनगरात ६५.५० टक्के आणि पुण्यात ६७.९५ टक्के गणना अर्जांचे डिजिटायझेशन झाले आहे. त्याउलट बुलढाणा, हिंगोली, उस्मानाबाद, गोंदिया, बीड, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, परभणी, अहमदनगर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत डिजिटायझेशनची टक्केवारी ८४ टक्क्यांहून अधिक नोंदवली गेली.
२४ ऑगस्टला प्रारूप यादी, नाव नसल्यास काय कराल?
२४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे या प्रारूप यादीत प्रत्यक्षात किती मतदारांची नावे कायम राहतात, किती नावे वगळली जातात याकडे राजकीय पक्षांसह मतदारांचेही लक्ष लागले आहे. प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला आणखी एक संधी मिळणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरदरम्यान मतदारांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर छाननी तसेच दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया पूर्ण करून २७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे आयोगाने जाहीर केले आहे.
पुणे जिल्ह्यात कशी आहे स्थिती?
मतदारांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची (एसआयआर) सोमवारी मुदत संपली असून, पुणे जिल्ह्यातील १०० टक्के मतदारांपर्यंत गणना प्रपत्र पोहोचविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. मात्र, एकूण मतदारांपैकी सुमारे २८ लाख ७९ हजार ७२८ मतदार आता मतदारयादीतून वगळले जाण्याची चिन्हे आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण ३१.७१ टक्के असून, एवढे मतदार मतदारयादीतून वगळण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. प्रामुख्याने शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला आणि हडपसर या मतदारसंघांतील सर्वाधिक मतदार मृत, स्थलांतरित किंवा ‘नॉट रेडी टू साइन’ या वर्गवारीत असल्याने त्यांनी अर्ज जमा केले नसल्याचे उघड झाले आहे.
‘एसआयआर’अंतर्गत वितरित करून जमा झालेल्या अर्जांपैकी ९९.९८ टक्के अर्जांच्या डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणखी दोन तीन दिवस डिजिटायझेशनची प्रक्रिया सुरूच राहील. मात्र, ‘एसआयआर’ची मुदत संपल्याने आता अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया बंद केल्याचे जिल्हा प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले आहे.
पुणे जिल्ह्यात ९० लाख ८० हजार १७३ मतदार आहेत. त्यापैकी ९० लाख ७९ हजार ८५२ म्हणजेच १०० टक्के मतदारांपर्यंत अर्ज पोहोचले आहेत. जिल्ह्यात खडकवासला, हडपसर, शिरूर हे मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघांतील १०० टक्के मतदारांपर्यंत अर्ज पोहोचले आहेत. एकूण मतदारांपैकी २८ लाख ७९ हजार ७२८ मतदार अर्थात ३१.७१ टक्के मतदार हे ‘अनकलेक्टेबल’ (ज्या मतदारांनी अर्जच जमा केले नाहीत) आहेत. यापैकी बहुतांश मतदारांचे नाव दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतरित झाले असावे. दुबार, मृत किंवा ‘नॉट रेडी टू साइन’ या वर्गातील मतदारांचे अर्ज हे ‘अनकलेक्टेबल’ झाले असल्याने ते अर्ज बाद होतील, असे जिल्हा प्रशासनाच्या अहवालात स्पष्ट केले आहे.
नागपुरात एसआयआर फक्त ६९ टक्क्यांवर
विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) वाढवून दिलेली मुदत सोमवारी संपली. जिल्ह्यातील ४६ लाख ३८ हजार ५८९ मतदारांपैकी ६८.७५ टक्के मतदारांनी अर्ज भरून बीएलओंकडे सादर केले. मात्र, ३०.७४ टक्के मतदारांचे अर्ज परत आले नाहीत. त्यामुळे सुमारे १४ लाख २६ हजार मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. अशा मतदारांची २२ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होणार असून, अंतिम यादी २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. मतदारयाद्या अचूक करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ कार्यक्रम हाती घेतला. त्याअंतर्गत प्रत्येक मतदाराकडून दोन प्रतींत अर्ज भरून घेणे अपेक्षित होते. जिल्ह्यातील मतदारांसाठी ९२ लाख ७६ हजार अर्जांची छपाई करून वितरण करण्यात आले होते. मुदतीत उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने आयोगाने १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, वाढीव मुदतीनंतरही ३०.७४ टक्के मतदार आढळले नाहीत. यामध्ये मृत, दुबार नावे आणि स्थलांतरित मतदारांचा समावेश असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.
ज्यांचे अर्ज प्राप्त झाले नाहीत, ते अर्ज रिकामेच अपलोड करण्यात आले. सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील अर्ज अपलोड करण्याचे प्रमाण ९९.४९ टक्के होते. पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपुरातील काही अर्ज अपलोड करणे बाकी होते. उर्वरित काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. २४ ऑगस्टला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. ज्यांचे अर्ज प्राप्त झाले नाहीत, अशा मतदारांना आयोगाकडून नोटीस पाठवून सुनावणी घेतली जाईल. ही सुनावणी मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात होईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी रचना इंदूरकर यांनी दिली.