• Tue. Aug 18th, 2026

गाळातून समृद्धीकडे… पावलांतून जलजागृतीकडे! ‘महा वॉकेथॉन’मधून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे बळ – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 18, 2026

पाणी हे केवळ तहान भागवत नाही. ते शेतकऱ्याच्या डोळ्यांतील उद्याची आशा असते, शिवारातील हिरवाईचा श्वास असते आणि गावाच्या भवितव्याची हमीही असते. म्हणून पावसाचे मोजमाप केवळ मिलिमीटरमध्ये करून चालत नाही. आकाशातून पडलेले किती पाणी आपण अडविले, किती जमिनीत जिरविले आणि किती उन्हाळ्यापर्यंत टिकविले, यावर गावाच्या जगण्यापासून शेतीच्या अर्थकारणापर्यंत बरेच काही अवलंबून असते.

नंदुरबारच्या डोंगरदऱ्यांतून वाहणाऱ्या पाण्याला थांबविण्याचा आणि त्याचवेळी शिवाराला नवसंजीवनी देण्याचा असाच एक प्रयत्न आता यशाची गोष्ट सांगत आहे. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ उपक्रमातून जिल्ह्याने निर्धारित उद्दिष्ट साध्य केले आहे.

धरणाच्या तळाशी वर्षानुवर्षे साचणारा गाळ जलाशयाची साठवण क्षमता कमी करतो. पण निसर्गाच्या व्यवहारात टाकाऊ असे फारसे काही नसते. धरणासाठी अडचण ठरणारा हाच गाळ शेतात पोहोचला की तो सुपीकतेची भेट घेऊन येतो.  त्यातील सेंद्रिय घटक, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि खनिजे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत करतात. म्हणजेच धरणातून गाळ बाहेर पडतो तेव्हा फक्त माती हलत नाही; पाण्यासाठी नवी जागा तयार होते आणि त्याचवेळी शेतकऱ्याच्या शिवारात समृद्धीची शक्यता पोहोचते.

याच विचारातून नंदुरबार जिल्ह्यात प्रशासन, मृद व जलसंधारण विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी एकत्र आले. कुठे यंत्रांनी गाळ उपसला, कुठे ट्रॅक्टर आणि डंपरमधून तो शेतापर्यंत पोहोचला, तर कुठे लोकसहभागाने कामाला अधिक बळ मिळाले. शासनाची योजना कागदावरून प्रत्यक्ष जमिनीवर उतरली आणि परिणाम दिसू लागले.

या सामूहिक प्रयत्नातून जिल्ह्यातील ३३ जलसाठ्यांमधून १० लाख ३७ हजार २६३ घनमीटर गाळ काढण्याचे निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यात आले. त्यामुळे सुमारे १.०३७ दशलक्ष घनमीटर जलसाठवण क्षमता पुन्हा उपलब्ध झाली. त्याचबरोबर नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामांतून ५१ नाल्यांमधील ८ लाख ३ हजार २२३ घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्टही पूर्ण झाले असून, त्यातून सुमारे ०.८०३ दशलक्ष घनमीटर क्षमता पुनर्स्थापित झाली आहे.

हे आकडे मोठे आहेत. पण त्यांचा खरा अर्थ आकड्यांच्या पलीकडे आहे. त्या प्रत्येक घनमीटरमध्ये पावसाचा आणखी एक थेंब साठविण्याची जागा आहे. भूजल पुनर्भरणाची शक्यता आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाईशी सामना करण्याची ताकद आहे आणि शेतजमिनीला अधिक सुपीक करण्याची आशाही आहे. म्हणून या योजनेचे यश किती गाळ बाहेर काढला यापेक्षा पाण्यासाठी किती जागा पुन्हा निर्माण झाली आणि किती शिवाराला त्याचा लाभ मिळाला, यात आहे.

शेतात पोहोचलेल्या गाळामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. रासायनिक खतांवरील अवलंबित्व आणि उत्पादन खर्च कमी करण्यासही हातभार लागू शकतो. एका बाजूला जलाशय अधिक पाणी सामावून घेण्यासाठी सज्ज होतो आणि दुसऱ्या बाजूला शेताला उपयुक्त माती मिळते. अशा प्रकारे जलसंधारण आणि शेतीचे अर्थकारण एकाच प्रक्रियेत परस्परांना पूरक ठरते.

या उपक्रमाला आर्थिक सहाय्याचीही जोड आहे. गाळ काढण्यासाठी तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरणासाठी यंत्रसामग्री व इंधन खर्चाकरिता प्रति घनमीटर ३१ रुपये दराची तरतूद आहे. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत गाळ वाहून नेणाऱ्या पात्र शेतकरी लाभार्थ्यांना प्रति एकर ३५.७५रुपये प्रति घनमीटर या दराने १५ हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान देण्याची तरतूद आहे. अत्यल्पभूधारक व लहान शेतकऱ्यांना अडीच एकरपर्यंत कमाल ३७ हजार ५०० रुपये अनुदान देय आहे. विधवा, दिव्यांग आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांनाही निर्धारित निकषांनुसार या योजनेचा लाभ मिळू शकतो.

पण जलसंधारण म्हणजे केवळ धरण खोल करणे किंवा नाला रुंद करणे नव्हे. पाण्यासाठी जमिनीची खोली वाढविताना जलसंवर्धनाची जाणीवही समाजमनात तितकीच खोलवर रुजवावी लागते. यंत्र पाण्यासाठी जागा निर्माण करू शकते; त्या पाण्याचे मोल जाणणारी संस्कृती मात्र माणसालाच निर्माण करावी लागते.

याच व्यापक भूमिकेतून मृद व जलसंधारण विभागाने आता जलसंवर्धनाला जनचळवळीचे स्वरूप देण्याचा संकल्प केला आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून राज्यभर साजरा करण्यात येणार असून, याच दिवशी सर्व जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येत आहे.

‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ही या उपक्रमाची संकल्पना आहे, तर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा त्याचा संदेश आहे. राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६जानेवारी २०२७ दरम्यान ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे.

नंदुरबारमध्ये २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महा वॉकेथॉनचा मार्गही निश्चित करण्यात आला आहे. जीटीपी कॉलेज ग्राउंड येथून वॉकेथॉनला प्रारंभ होऊन अंधारे स्टॉप, नेहरू चौक, महाराणा प्रताप चौक, मार्केट रोडमार्गे खोडाई माता मंदिर आणि पुन्हा जीटीपी कॉलेज ग्राउंड असा मार्ग असणार आहे.

सकाळी ६ वाजता कार्यक्रमस्थळी आगमन, ६.१५ वाजता वॉर्म-अप, ६.४५ वाजता मृद व जलसंधारणाची शपथ, तर ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून महा वॉकेथॉनला प्रारंभ होईल. सकाळी ८ वाजता वॉकेथॉनचा समारोप आणि ८.३० वाजता संदेश, पुरस्कार वितरण व आभार प्रदर्शन होईल.

वयाची १५ वर्षे पूर्ण केलेल्या सर्व नागरिकांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. लोकप्रतिनिधी, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, खेळाडू, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, स्वयंसेवी संस्था, रोटरी व लायन्स क्लब, महिला बचत गट आणि सर्वसामान्य नागरिकांना या जलचळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सहभागासाठी क्यूआर आधारित ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देण्यात येणार असून प्रथम दहा विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. सोशल मीडियावर या उपक्रमाचा संदेश अधिक व्यापक करण्यासाठी #MahaWalkathon, #WalkForWater आणि #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग वापरण्यात येणार आहेत.

नंदुरबारच्या जलसंधारणाची ही गोष्ट म्हणूनच आता दोन दृश्यांत उलगडते. एका दृश्यात धरणाच्या तळातून गाळ बाहेर पडतो. तो शेतकऱ्याच्या शिवारात पोहोचतो. जलाशयात पाण्यासाठी पुन्हा जागा निर्माण होते आणि शेतातील मातीला सुपीकतेची जोड मिळते.

दुसऱ्या दृश्यात त्याच पाण्यासाठी माणसे रस्त्यावर चालणार आहेत. हातात जलसंवर्धनाचा संदेश आणि मनात पुढच्या पिढीच्या पाण्याची चिंता घेऊन. या दोन्ही दृश्यांना जोडणारा धागा एकच आहे उद्याचे भविष्य.

शासन योजना देऊ शकते, प्रशासन यंत्रणा उभी करू शकते, यंत्रे गाळ उपसू शकतात; पण पाण्याची संस्कृती आदेशाने निर्माण होत नाही. ती निर्माण होते जेव्हा गावाला आपल्या तलावाची काळजी वाटते, शेतकऱ्याला आपल्या मातीत पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे मोल कळते आणि नागरिकाला नळातून येणाऱ्या प्रत्येक थेंबामागचा निसर्गाचा प्रवास समजतो.

नंदुरबारने ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’मधून उद्दिष्ट साध्य करून जलसंधारणाच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकले आहे. गाळ जलाशयातून बाहेर आला, शिवारात पोहोचला आणि पाण्यासाठी हरवलेली जागा पुन्हा निर्माण झाली. आता ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मधून हीच जाणीव लोकांच्या मनात पोहोचणार आहे. कारण पाणी हे केवळ आजच्या पिढीचे नाही. उद्याच्या पिढीने आपल्या विश्वासावर ठेवलेली ती अमूल्य ठेव आहे. आणि म्हणून २१ ऑगस्टला नंदुरबारच्या रस्त्यावर पडणारे प्रत्येक पाऊल केवळ वॉकेथॉनमधील पाऊल नसेल. ते माती वाचविण्याच्या, पाणी जपण्याच्या आणि जलसुरक्षित नंदुरबार घडविण्याच्या दिशेने टाकलेले एक सामूहिक पाऊल असेल.

रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

समृद्ध भविष्याच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे यशस्वी डेस्टिनेशन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
बदलत्या विचारांचा आणि स्त्रीशक्तीचा वेध घेणारा ‘लग्न आणि बरंच काही’ चित्रपट – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद
शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंदच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed