• Wed. Aug 19th, 2026

बदलत्या विचारांचा आणि स्त्रीशक्तीचा वेध घेणारा ‘लग्न आणि बरंच काही’ चित्रपट – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 18, 2026

मुंबई, दि. १८ : बदलत्या काळानुसार मुलींचे शिक्षण, स्वावलंबन आणि विचारसरणी प्रगत होत आहे. पारंपरिक रूढी-परंपरा आणि आधुनिक विचार यांची सांगड घालत महिलांना स्वातंत्र्याने पुढे जाताना येणाऱ्या समस्यांचे चित्रण ‘लग्न आणि बरंच काही’ या मराठी चित्रपटातून करण्यात आले आहे. हा चित्रपट तीन पिढ्यांतील महिलांना निश्चितच आपलासा वाटेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

स्त्रियांनी स्त्रियांसाठी साकारलेला हा चित्रपट स्त्रीशक्तीचा उत्सव साजरा करणारा असून, बदलत्या सामाजिक परिस्थितीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. मुलींसोबतच मुलांनाही या चित्रपटातून प्रगत विचार, नातेसंबंध आणि बदलत्या सामाजिक मूल्यांविषयी शिकण्यासारखे ‘बरंच काही’ मिळणार आहे.

म्हाळसा एंटरटेंन्मेंट आणि अव्यान आर्टस् प्रस्तुत ‘लग्न आणि बरंच काही’ या चित्रपटाच्या कलाकारांनी मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले.

यावेळी बाबासाहेब पाटील, चित्रपटाच्या निर्मात्या डॉ. संजना सुरेश पै आणि अंजली तुषार नान्नजकर, दिग्दर्शिका वेदांती दाणी यांच्यासह अनेक सहकारी व चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे सदस्य उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या, मुलीच्या दृष्टिकोनातून तिच्या जन्मापासून बालपण, किशोरवय आणि वयात येईपर्यंतच्या आयुष्यात आलेले विविध अनुभव या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे आजीच्या पिढीपासून आईची पिढी, आजची पिढी तसेच पुढील पिढीतील महिलांनाही या चित्रपटातील कथानक आणि अनुभवांशी नाते जोडता येईल.

महिलेच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना आणि टप्पे घडत असताना तिच्या स्वतःच्या आकांक्षा, अपेक्षा आणि दृष्टिकोनही असतात. या दोन्हींचा समतोल कसा साधता येईल, हा महत्त्वपूर्ण विषय चित्रपटातून हलक्या-फुलक्या आणि संवेदनशील पद्धतीने मांडण्यात आला आहे, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.

‘लग्न आणि बरंच काही’ हा चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक महिलेला तसेच विशेषतः पुरुषांनाही महिलांच्या अनुभवांकडे आणि त्यांच्या भावविश्वाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळेल. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देत, या चित्रपटातून प्रेक्षकांना निश्चितच काहीतरी नवीन शिकायला मिळेल, असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed