नाशिक, दि. १६ ऑगस्ट : नागरिकांना अधिक सुरक्षित, आधुनिक आणि दर्जेदार शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात येत आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, आवश्यक उपकरणे तसेच प्रशिक्षित मनुष्यबळाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला येथील उपजिल्हा रुग्णालयातील मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश शिंपी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. रमाकांत सोनवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी संदीप सूर्यवंशी, अनंत पवार यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला उपजिल्हा रुग्णालयात सुमारे २ कोटी ३५ लाख रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुविधेमुळे रुग्णालयातील शस्त्रक्रिया सेवा अधिक आधुनिक, सुरक्षित, स्वच्छ आणि रुग्णाभिमुख होण्यास मदत होणार आहे. या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरची उभारणी आधुनिक वैद्यकीय मानके व आवश्यक तांत्रिक निकषांचा विचार करून करण्यात आली आहे. या ऑपरेशन थिएटरमध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ऑपरेशन थिएटरमध्ये विशेष सर्जिकल निर्जंतुकीकरण व्यवस्था, HEPA फिल्टर व Positive Air Pressure प्रणाली, तसेच स्वच्छ व नियंत्रित हवेची गुणवत्ता राखण्यासाठी आवश्यक यंत्रणा बसविण्यात आली आहे. तापमान, आर्द्रता आदी घटकांचे नियंत्रण करून संसर्गाचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने या सुविधेची रचना करण्यात आली आहे. याशिवाय अत्याधुनिक अॅनेस्थेशिया मशीन, OT Lights, Surgical Pendant, Medical Gas System आणि Monitoring System यासारख्या उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे. या सुविधांमुळे शस्त्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने व सुरक्षित वातावरणात करण्यास मदत होणार आहे. तसेच मॉड्युलर ऑपरेशन थिएटरच्या माध्यमातून उपलब्ध जागेचा अधिक परिणामकारक वापर करता येणार असून, भविष्यातील वैद्यकीय गरजांनुसार कॉन्फिगरेशन व उपकरणांमध्ये आवश्यक बदलही सुलभ होणार आहे.
मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, नाशिक, मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांतील रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक शस्त्रक्रिया सुविधांच्या धर्तीवर येवला उपजिल्हा रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्यांच्या जवळच अत्याधुनिक, स्वच्छ व संसर्गनियंत्रित वातावरणातील शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, नागरिकांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे. या सुविधेमुळे येवला व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले असल्याचे मंत्री श्री भुजबळ यांनी सांगितले.
0000