• Sun. Aug 16th, 2026

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेसह  शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 16, 2026

नाशिक, दि.१६ ऑगस्ट :  राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी सहाय्यभूत साधने उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्यावतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेसह विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 60  वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगाचे जीवन अधिक सुलभ, सुरक्षित व स्वावलंबी व्हावे, यासाठी दैनंदिन जीवनात आवश्यक असलेली विविध सहाय्यभूत साधने मोफत उपलब्ध करून दिली जातात. या योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र ज्येष्ठ नागरिकांनी व दिव्यांगांनी  घ्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला येथील माऊली लॉन्स येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मोफत सहाय्यभूत साहित्याचे वाटप करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी बाजार समितीचे सभापती वसंत पवार, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक पाटील, तहसिलदार आबा महाजन, गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच लाभार्थी, नागरिक उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले , दिव्यांगाना सेवासुविधा मिळण्यासाठी नाशिक येथे प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मंजूर करण्यात आले आहे.  तसेच वयोमानानुसार ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कानाचे मशीन, चालण्यासाठी काठी व कुबड्या, चष्मा, व्हीलचेअर, कॉमर्ड चेअर, इलेक्ट्रिक सायकल, वॉकर तसेच आवश्यकतेनुसार इतर सहाय्यभूत साधने मोफत उपलब्ध करून दिली जातात. ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुलभ, सुरक्षित व स्वावलंबी व्हावे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 60 वर्षांवरील पात्र ज्येष्ठ नागरिकांनी वयोश्री योजनेची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह योजनेचा लाभ घ्यावा. तसेच नवीन लाभार्थ्यांनी या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह नाव नोंदणी करावी, जेणेकरून विविध शिबिरांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे शक्य होईल.

ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सुलभता, सुरक्षितता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने वयोश्री योजना महत्त्वपूर्ण आहे. वयोमानानुसार उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी एकही पात्र लाभार्थी आवश्यक साधनांपासून वंचित राहणार नाही याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे निर्देश मंत्री श्री. भुजबळ यांनी  दिले.

मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते तालुक्यातील लाभार्थ्यांना  भारत सरकार, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय वयोश्री योजना व एडिप योजनेअंतर्गत कानाचे मशीन, ब्रेल लिपी किट आणि स्मार्ट मोबाईल, चालण्यासाठी काठी व कुबड्या, चष्मा, व्हीलचेअर, वॉकर, इलेक्ट्रिक सायकल, कॉमर्ड चेअर, संवादासाठी विशेष उपकरणे आदी सहाय्यभूत साधनांचे वाटप करण्यात आले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed