• Wed. Aug 12th, 2026

    नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 12, 2026

    मुंबई, दि. १२ : राज्यात यंदाच्या पावसाळ्यात अनेक भागांत अतिवृष्टी झाल्यामुळे रस्ते, पूल तसेच शासकीय इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागातील नागरिकांच्या दळणवळणाला कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी नुकसानग्रस्त रस्ते व पुलांची दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेऊन ती वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

    सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत मंत्री भोंसले यांनी राज्यातील पावसाळी परिस्थिती, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, रस्ते व पुलांची दुरुस्ती, नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली कामे, महामार्गालगतच्या जनसुविधा केंद्रांची कामे तसेच ‘महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास आराखड्या’च्या जिल्हानिहाय प्रगतीचा आढावा घेतला. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव बांधकाम आबासाहेब नागरगोजे, सचिव रस्ते शरद राजभोज तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व मुख्य अभियंता उपस्थित होते. राज्यातील सर्व अधीक्षक अभियंते दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

    अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीला प्राधान्य

    राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील रस्ते, पूल आणि इतर सार्वजनिक बांधकाम सुविधांच्या नुकसानीचा आढावा घेताना मंत्री भोंसले यांनी दुरुस्तीच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. अतिवृष्टीमुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे, वाहून गेलेले रस्त्याचे भाग, पुलांचे नुकसान आणि अन्य संरचनात्मक त्रुटी तातडीने दूर कराव्यात. नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना करून त्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्तीची कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले.

    पावसाळ्यात रस्त्यांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देताना स्थानिक परिस्थिती, पर्जन्यमान आणि भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन दुरुस्ती व पुनर्बांधणीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

    नाशिक कुंभमेळ्याच्या कामांचा सविस्तर आढावा

    नाशिक येथे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. कुंभमेळ्याच्या कालावधीत देशभरातून मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात येणार असल्याने रस्ते, वाहतूक व्यवस्था, निवास सुविधा आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

    या अनुषंगाने घोटी–त्र्यंबकेश्वर मार्ग, नाशिक रिंग रोड, ओझर विमानतळाशी संबंधित कामे, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील गेस्ट हाऊसचे बांधकाम, त्र्यंबकेश्वर येथील डी.पी. रस्त्यांची कामे तसेच भूसंपादन प्रक्रिया यांचा आढावा घेण्यात आला.

    कुंभमेळ्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली सर्व कामे निश्चित केलेल्या नियोजनानुसार वेळेत पूर्ण करावीत. कामांच्या प्रगतीमध्ये कोणत्याही कारणामुळे विलंब होणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश मंत्री भोसले यांनी दिले.

    कामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नको

    विकासकामे वेळेत पूर्ण करण्याबरोबरच त्यांची गुणवत्ता सर्वोच्च दर्जाची असणे आवश्यक आहे. कामे घाईघाईने पूर्ण करण्याच्या प्रयत्नात गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होता कामा नये, अशी स्पष्ट सूचना मंत्री भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

    रस्ते, पूल आणि इमारतींच्या कामांमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता, तांत्रिक निकषांचे पालन आणि कामांची प्रत्यक्ष पाहणी याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार निर्माण होणार नाही, यासाठी नियमित तपासणी आणि देखरेखीची प्रभावी यंत्रणा राबवावी, असे त्यांनी सांगितले.

    अतिवृष्टीच्या बदलत्या स्वरूपाचा विचार करून रस्ते बांधणी

    हवामानातील बदलांमुळे पर्जन्यमानाच्या स्वरूपात दिवसेंदिवस बदल होत आहे. काही भागात अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने रस्ते आणि पुलांच्या बांधकामाचे नियोजन करताना त्या-त्या भागातील पर्जन्यमान, भौगोलिक परिस्थिती, पाण्याचा निचरा आणि पूरस्थिती यांचा शास्त्रीय पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे, असे मंत्री भोसले यांनी सांगितले.

    भविष्यातील पर्जन्यमानाचा विचार करून रस्ते बांधणी व दुरुस्तीचे आराखडे तयार करावेत. रस्त्यांवर पाणी साचणार नाही, पाण्याचा योग्य निचरा होईल आणि अतिवृष्टीच्या परिस्थितीत रस्त्यांचे नुकसान कमीत कमी होईल, अशा पद्धतीने कामांचे नियोजन करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड व संवर्धनाला चालना

    अतिवृष्टीग्रस्त भागातील रस्त्यांवरील खड्डे आणि खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याबरोबरच रस्त्यालगत वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

    रस्ते विकासासोबत पर्यावरण संवर्धनालाही समान महत्त्व देण्यात यावे. स्थानिक हवामान व भौगोलिक परिस्थितीला अनुकूल असलेल्या वृक्षप्रजातींची निवड करून वृक्षलागवड करावी आणि लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन सुनिश्चित करावे, असे निर्देश देण्यात आले.

    महामार्गालगतच्या जनसुविधा केंद्रांच्या कामांना गती

    राज्यातील प्रमुख महामार्गांवर प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित जनसुविधा केंद्रांच्या कामांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. या केंद्रांमध्ये प्रवाशांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी कामांना गती देण्याच्या सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या.

    महामार्गांचा विकास केवळ वाहतुकीपुरता मर्यादित न ठेवता प्रवाशांना सुरक्षित, सुविधायुक्त आणि सुसज्ज प्रवासाचा अनुभव मिळेल, या दृष्टीने पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.

    ‘महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास आराखड्या’चा जिल्हानिहाय आढावा

    बैठकीत ‘महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना २०२५–२०४७’ अंतर्गत जिल्हानिहाय रस्ते विकास आराखड्याच्या सद्यस्थितीचाही आढावा घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातील रस्ते नेटवर्क, प्रमुख मार्गांची आवश्यकता, वाहतूक वाढीचा अंदाज, औद्योगिक व पर्यटन विकासाची गरज तसेच भविष्यातील पायाभूत सुविधांच्या गरजा लक्षात घेऊन रस्ते विकासाचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

    राज्याच्या दीर्घकालीन विकासाला सक्षम आणि दर्जेदार रस्ते नेटवर्कची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आणि भविष्योन्मुख रस्ते विकास आराखडा तयार करताना स्थानिक गरजा तसेच राज्याच्या व्यापक विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या मार्गांना प्राधान्य देण्यात यावे, असे मंत्री भोसले यांनी सांगितले.

    वेळ, गुणवत्ता आणि सुरक्षितता यांचा समन्वय

    सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या प्रत्येक प्रकल्पामध्ये वेळेत काम पूर्ण करणे, गुणवत्तापूर्ण बांधकाम आणि नागरिकांची सुरक्षितता या तीन बाबींना सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिकांना तातडीने दिलासा मिळेल, यासाठी विभागाने अधिक गतिमान पद्धतीने काम करावे. तसेच कुंभमेळ्यासारख्या मोठ्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पायाभूत सुविधांची कामे नियोजनाच्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून त्यांचा दर्जा कायम ठेवावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

    00000

     

    नंदकुमार वाघमारे/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed