महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ची अत्यंत प्रभावीपणे व पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी सुरू केली आहे. रायगड जिल्ह्यात या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत असून बहुतांश शेतकरी लाभार्थ्यांची प्रक्रिया गतीने पूर्ण केली जात आहे.
योजनेतील प्रमुख निकष व स्वरूप..
• कर्जमुक्ती योजनाः दि. ०१/०४/२०१९ ते दि. ३१/०३/२०२५ दरम्यान वाटप केलेले अल्पमुदत पीककर्ज/पुर्नगठीत मध्यम मुदत कर्जातील दि. ३०/०९/२०२५ रोजी थकीत व दि. ३१/०३/२०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या हप्त्यांवर मुद्दल व व्याजासह कमाल रु. २.०० लाखांपर्यंत कर्जमाफी.
•एकवेळ समझोता योजना (OTS): थकीत रक्कम २ लाखांपेक्षा जास्त असल्यास, २ लाखांवरील उर्वरित रकमेची परतफेड केल्यावर शेतकऱ्याला रु. २.०० लाख योजनेचा लाभ मिळेल.
• प्रोत्साहनपर लाभः सन २०२२-२३ ते २०२४-२५ या काळात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान रु. ५,००० ते कमाल रु. ५०,००० पर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील अंमलबजावणीची अद्ययावत आकडेवारी…
• पोर्टलवरील एकूण नोंदणी: रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ८९१४ व राष्ट्रीयकृत बँकांची ३७६८ मिळून एकूण १२६८२ शेतकरी खाती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत.
• पहिली पात्र यादीः पहिल्या टप्यात प्राप्त ७३६७ खात्यांपैकी (DCCB: २२७७ राष्ट्रीयकृतः ५६९ ) आतापर्यंत २८४६ खात्यांचे (३९% पेक्षा जास्त) आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
• शासनाकडून प्राप्त रक्कमः १८५९ शेतकऱ्यांसाठी रु. १०,९५,४३,००८/- ची रक्कम प्राप्त झाली असून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतक-यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा करुन त्यांना बेबाकी प्रमाणपत्र दिले असून त्यांना नव्याने पिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
• इतर तपशीलः अॅग्रीस्टॅक क्रमांक नसलेले ४३८६, मयत खातेदार ५३७, आणि दुसऱ्या जिल्ह्यातील खातेदार १४४ आहेत.
प्रशासकीय नियंत्रण व पारदर्शक तक्रार निवारण..
• नियंत्रण समित्या : योजनेच्या योग्य समन्वयासाठी राज्य, विभाग व जिल्हा स्तरावर समित्या कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यात जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, बँक व्यवस्थापक व CEO यांच्या नियंत्रणाखाली काम सुरू आहे.
• जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती (DLC) : मा. जिल्हाधिकारी, रायगड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्राप्त १० तक्रारींपैकी ५ तक्रारींचे यशस्वी निवारण केले आहे.
• तालुकास्तरीय समिती (TLC): तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरणातील अडचणी सोडवल्या जात आहेत.
*शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन..*
योजनेच्या जलद लाभासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपले नाव संबंधित बँक शाखा, सेवा संस्था किंवा ग्रामपंचायत कार्यालयातील यादीत तपासून घ्यावे. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा ‘सीएससी (CSC)’ केंद्रावर जाऊन अॅग्रीस्टॅक / फार्मर आयडी नोंदणी व आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून अनुदानाची रक्कम थेट खात्यात वर्ग करणे सुलभ होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी मा.श्री. किशन जावळे, जिल्हा उपनिबंधक तनवीर पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय कुलकर्णी यांनी केले आहे.
मनोज सुमन शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग