मुंबई, दि. १२ : पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पारधी जमातीतील सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्यांच्या आवडीनुसार व कौशल्याला अनुरूप व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र पारधी समाजातील लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज संबंधित कार्यालयात सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर २०२६ आहे. पारधी समाजातील युवकांना पारंपरिक उपजीविकेवरील अवलंबित्व कमी करून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या निवडीनुसार व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य मिळणार असल्याने युवकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र युवकांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई, कस्तुरबा क्रॉस रोड नं.2, कस्तुरबा महानगरपालिकेची मराठी शाळा क्र.2 सभागृह हॉल, तळमजला, बोरिवली पुर्व, मुंबई 400066 यांच्याशी संपर्क साधावा.
अश्विनी पुजारी/विसंअ
0000