• Fri. Aug 7th, 2026

    Sushma Andhare: जरांगेंच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे, सुषमा अंधारेंना वाटतेय वेगळीच शंका; पडद्याआड कोणत्या घडामोडी सुरू असल्याचा दावा?

    Sushma Andhare: जरांगेंच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे, सुषमा अंधारेंना वाटतेय वेगळीच शंका; पडद्याआड कोणत्या घडामोडी सुरू असल्याचा दावा?

    Eknath Shinde: मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून एकनाथ शिंदेंवर टीका केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.

    जरांगेंच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे, सुषमा अंधारेंना वाटतेय वेगळीच शंका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : राज्यभरात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटताना दिसत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिला असतानाच आता मराठवाड्यात कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 4 मराठा लोकप्रतिनिधींचे दाखले जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहेत. प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यानं कुणबी नोंदीवरून वातावरण चागलंच तापलं आहे. यावरून मनोज जरांगे यांनी सरकारला धारेवर धरलं असून मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना पुन्हा एकदा जरांगे यांनी बोलून दाखवली आहे.

    मनोज जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या वादत उडी घेतली असून त्यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. ‘या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की मराठा आरक्षणाचे नेमकं झालं काय? खरंच एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आरक्षण खरं होत का?’ असं म्हणत अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मराठा आरक्षण देण्यासंदर्भातील हेतूवरच शंका उपस्थित केली आहे.

    सुषमा अंधारे एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत म्हणाल्या की, “7-8 महिन्यांपूर्वी सुद्धा आझाद मैदानातील आंदोलनंतर मी सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली होती. मुळात एकनाथ शिंदे यांना स्वतःला ‘मराठा मॅन’ म्हणून प्रस्थापित करण्याची घाई अन् त्यातून उतावीळ घेतले गेलेले निर्णय, तसंच शिंदे-फडणवीसांमधील असलेले कोल्ड वॉर जे आता अतिशय टोकाला पोहचलेले आहे. त्यातून देवेंद्र फडणवीस हे शिंदेंवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबतीत एकनाथ शिंदे काही भूमिका घेणार असतील तर त्यांना ती घेऊ देतील ते फडणवीस कसले?’ असा टोला अंधारे यांनी लगावला आहे.

    दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर शिंदेंच्या भूमिका अवलंबून असतील तर शिंदे यांनी मराठा समाजाला पोकळ शब्द दिलाच का? दोघांचं राजकारण होतंय आणि जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना घेरलं आहे. एकीकडे मनोज जरांगे यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर प्रथमच टीका करत शिंदे यांनी दुहेरी खेळ करत फसवणूक केली असल्याच म्हटलं आहे. त्यात आता ठाकरेंच्या पक्षाकडून देखील एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत त्यांची अडचण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत आगामी काळात आणखी काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.