• Sat. Jul 25th, 2026

    जेनझीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या! राज ठाकरेंचं शरसंधान; मोदींसोबतच्या कॉलचा किस्सा सांगितला

    जेनझीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या! राज ठाकरेंचं शरसंधान; मोदींसोबतच्या कॉलचा किस्सा सांगितला

    Raj Thackeray: जेनझीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. राज यांनी देशातील तरुणाईचं अभिनंदन केलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: नीट पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. यावर बोलताना जेनझीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या, अशी तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. उद्या मुंबईत तरुणांचा मोर्चा निघणारच, असं ठासून सांगताना त्यांनी आंदोलकांचं अभिनंदन केलं. ते शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानातून माध्यमांशी संवाद साधत होते.

    जेनझीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या. तरुणाईनं या सरकारला जमिनीवर आणलं. हा सर्वार्थानं तरुणाईचा विजय आहे. त्यांच्यामुळे या मस्तवाल सरकारला माघार घ्यावी लागली. त्याचा जल्लोष आम्ही उद्या करू. आता तरुणाईचा राग प्रधानांवरुन पंतप्रधानांपर्यंत गेलेला असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचं राज ठाकरेंनी विशेष अभिनंदन केलं. दिपके यांनी पुढील निर्णय घ्यावेत. त्यांना आमचा पाठिंबा असेल, असं राज ठाकरे म्हणाले.
    Maharashtra TimesDharmendra Pradhan: झुरळांचा दणका! नॉट आऊट 12 वाल्या प्रधानांची विकेट; आता ‘त्या’ यादीत PM मोदींचे केवळ 6 मंत्री
    धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना राज ठाकरेंनी भाजपनं विरोधी पक्षात काय केलं, याचीही आठवण करून दिली. काँग्रेस सत्तेत असताना भाजपनं अनेकदा मंत्र्यांचे राजीनामे मागितले. रेल्वेचा अपघात झाला की लगेच रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी व्हायची. तेव्हा राजीनामे मागितलेत ना? तेव्हा काय रेल्वे मंत्री ट्रेन चालवायचे का? असा सवाल राज यांनी विचारला.

    आपल्याकडे शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण मोठं आहे. आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री असताना किती वेळा परिक्षांचे पेपर फुटले? नीटचा पेपर फुटल्यावर २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. २०१७-१८ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्याशी माझा मोबाईलवरुन संवाद झाला होता. पेपर फुटीच्या घटना घडत राहिल्या, तर पुढे विद्यार्थी आत्महत्या करतील, असं मी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं, अशी आठवण राज यांनी सांगितली.
    Maharashtra TimesDharmendra Pradhan: सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश; मोदी सरकार झुकलं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
    आम्हाला कोण काय करणार, आम्हाला कोण विचारणार, अशी भावना सरकारमध्ये तयार झाली होती. या मस्तवाल सरकारला तरुणांनी रस्त्यावर आणलं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, अशा शब्दांत राज यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं. उद्या त्याचा जल्लोष करू. त्यासाठी मोठ्या संख्येनं या, असं आवाहन राज यांनी केलं.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

    मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

    ‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

    टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

    लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

    लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

    २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

    शैक्षणिक पात्रता
    कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा