• Tue. Jul 21st, 2026
    मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार! सुमारे अडीच हजार घरांची सोडत लवकरच; कधी होणार घोषणा?

    MHADA Lottery 2026: गेल्या तीन महिन्यांपासून अल्प प्रतिसादामुळे मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया लांबवली होती. पण अखेर मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. मुंबई महामंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

    म.टा. प्रतिनिधी, मुंबई: म्हाडा मुंबई मंडळाच्या सुमारे अडीच हजार घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपण्याची चिन्हे आहेत. तीन महिन्यांपासून सोडतीच्या तारखेची वाट पाहणाऱ्या अर्जदारांसाठी पुढील आठवड्यात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. म्हाडाकडून सोडतीचा अधिकृत कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

    म्हाडाने ३० मार्च रोजी मुंबईतील दोन हजार ६४० घरांसाठी सोडत जाहीर केली होती. या योजनेसाठी ७५ हजार ३६६ अर्ज प्राप्त झाले. सुरुवातीला १५ मे रोजी संगणकीय सोडत काढण्याचे नियोजन होते. मात्र अपेक्षेपेक्षा कमी अर्ज आल्याने अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आणि सोडतीची तारीख ५ जून अशी निश्चित करण्यात आली. त्यानंतरही अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. तसेच, विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर नव्या तारखेची घोषणा करण्याचे म्हाडाने नमूद केले. मात्र, जुलैचा अर्धा महिना उलटूनही सोडतीबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने अर्जदारांमध्ये नाराजी वाढू लागली होती.

    Maharashtra TimesMaharashtra Weather: महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, संपूर्ण आठवडा विजांचा कडकडाट होणार; मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार?

    घरासाठी भरलेली अनामत रक्कम अनेक महिन्यांपासून अडकून पडल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची भावना अनेक अर्जदारांनी व्यक्त केली होती. तसेच, सोडतीतील विलंबामुळे घरखरेदीचे नियोजनही रखडल्याची तक्रार अनेकांकडून करण्यात येत होती. आता पुढील आठवड्यात अधिकृत कार्यक्रम जाहीर होणार असल्याने अर्जदारांची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सोडतीची तारीख, अंतिम अर्जदारांची यादी आणि पुढील प्रक्रिया याबाबतची माहितीही म्हाडाकडून प्रसिद्ध केली जाईल.

    पुण्यातही म्हाडाची सोडत

    मुंबई-पुणे महामार्गालागत हक्काचं घर मिळवण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ताथवडे गृहनिर्माण प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात ६३४ घरांची सोडत जाहीर केली आहे. ताथवडे प्रकल्पात तब्बल ७९२ घरं असून त्यापैकी ६३४ घरांची सोडत जाहीर केली आहे. रविवारी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार २० जुलैपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. त्यानंतर २३ ऑगस्टपर्यंत सोडतपूर्व प्रकिया पूर्ण केली जाईल आणि मग २५ ऑगस्ट रोजी सोडत काढली जाईल.

    Maharashtra TimesMumbai Local: अपुऱ्या बळावर लोकलची धाव! मध्य रेल्वेत केवळ ५३% लोकोपायलट; पश्चिम रेल्वेत सुरक्षा दलाच्या हजारो जागा रिक्त

    ताथवडे गृहनिर्माण प्रकल्पात ६३४ घरांचं काम पूर्ण झाल्यामुळे ही सोडत जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित घरांचंही काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. १ बीएचके घरांची किंमत अंदाजे ४६ लाख रुपये तर २ बीएचके घरांची किंमत ६४ लाख ५० हजार रुपये असण्याची शक्यता आहे. या किंमती सर्वसामान्यांना परवडत नसल्यामुळे त्यांनी यापूर्वी सोडतीकडे पाठ फिरवली होती. म्हणून यावेळी म्हाडाने उत्पन्नाची अट शिथिल केली आहे. आता अल्प आणि मध्यम गटातील घरांसाठी कोणत्याही उत्पन्न गटातील व्यक्ती अर्ज करू शकतात.

    मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणांवरील म्हाडाची घरं महागडी असल्याचा आरोप केला जात आहे. यावरती तुमचे काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा