• Tue. Jul 21st, 2026

    ‘कानडा राजा पंढरीचा’मधून आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 20, 2026
    ‘कानडा राजा पंढरीचा’मधून आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर – महासंवाद

    मुंबई, दि. २० : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त ‘कानडा राजा पंढरीचा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता रंगशारदा, वांद्रे (पश्चिम), मुंबई येथे हा कार्यक्रम सादर होणार आहे. ‘कानडा राजा पंढरीचा’ हा महाराष्ट्राच्या समृद्ध भक्तीपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या सांस्कृतिक वारशाचा सुरेल आविष्कार आहे. विठ्ठलभक्ती, संतपरंपरा आणि अभंगसंगीत यांच्या माध्यमातून रसिकांना भक्तिरसपूर्ण सांगीतिक अनुभव देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलनामाच्या भक्तीभावात रसिकांना चिंब करणारा हा विशेष सांगीतिक सोहळा ठरणार आहे.

    या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या सुमधुर आवाजातून भक्तिगीते, अभंग आणि विठ्ठलभक्तीपर रचनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. संगीत संयोजन निरंजन लेले यांचे असून, कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. सचिन सावंत, अथर्व आठल्ये, संतोष दिवेकर, अमित गोठीवरेकर आणि संदीप कुलकर्णी हे वादक कलाकार कार्यक्रमात साथसंगत करणार आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात आषाढी एकादशी, तसेच पंढरपूरची वारी यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संतपरंपरेतील संतांच्या अभंगवाणीने महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेला समृद्ध केले आहे. या समृद्ध भक्तीपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा परिचय नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने ‘कानडा राजा पंढरीचा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याबरोबरच भक्तिसंगीत, संतपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, मुंबई व परिसरातील विठ्ठलभक्त, वारकरी, संगीतप्रेमी, कला रसिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिरसपूर्ण सांगीतिक अनुभवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

    0000

    संजय ओरके/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed