• Sat. Jul 18th, 2026

    ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनें’तर्गत बोधगयासाठी विशेष तीर्थयात्रा रेल्वेचे २० जुलै रोजी प्रस्थान – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 18, 2026
    ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनें’तर्गत बोधगयासाठी विशेष तीर्थयात्रा रेल्वेचे २० जुलै रोजी प्रस्थान – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनें’तर्गत मुंबई विभागातील ८०० पात्र लाभार्थ्यांसाठी बिहारमधील बोधगया येथे विशेष तीर्थयात्रा रेल्वेसेवेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ही विशेष रेल्वे सोमवार, दि.२० जुलै रोजी दुपारी २ वाजता दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरुन प्रस्थान करणार आहे.

    राज्यातील नागरिकांना देशातील ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांचे दर्शन घडवून आणणे, तसेच समाजातील विविध घटकांना अध्यात्म, सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय एकात्मतेची अनुभूती देणे, हा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

    या विशेष तीर्थयात्रेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील पात्र लाभार्थी दि. २० जुलै ते २६ जुलै २०२६ या कालावधीत सहभागी होणार आहे.

    विशेष रेल्वेच्या प्रस्थान कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंढे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेल्या बोधगया या जागतिक कीर्तीच्या पवित्र स्थळाला भेट देण्याची संधी या विशेष तीर्थयात्रेमुळे लाभार्थ्यांना मिळणार आहे. बौद्ध धम्मातील अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान असलेल्या बोधगयेचे दर्शन सुरक्षित, सुसंघटित आणि सुलभ पद्धतीने घडवून आणण्यासाठी शासनाने ही विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली आहे.

    मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र नागरिकांना तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देतानाच शासनाच्या लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक उपक्रमांना अधिक बळकटी मिळत आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

    ०००

    शैलजा पाटील/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed