• Sat. Jul 18th, 2026
    आक्षेपार्ह फोटोवरुन ब्लॅकमेल, दोन तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्यांची खंडणी, रीलस्टार महिलेसह तिघांना अटक

    Jalna Reel Star arrest : आरोपींकडून सोन्याच्या दोन अंगठ्या, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दोन दुचाकींसह एकूण 3 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जालना : आक्षेपार्ह फोटो काढून बदनामी करण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या एका ब्लॅकमेलर टोळीचा शहरातील चंदनझिरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात स्वतःला ‘रिलस्टार’ म्हणून ओळख निर्माण केलेली एक महिला आणि वकिलीचे शिक्षण घेणारा तरुण व अन्य एक जण अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.

    आरोपींकडून सोन्याच्या दोन अंगठ्या, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दोन दुचाकींसह एकूण 3 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    घर दाखवण्याच्या बहाण्याने बोलावलं

    जालन्याचे उप विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना शहरातील नवीन मोंढा परिसरात राहणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तीची काही दिवसांपूर्वी महिला आरोपीशी ओळख झाली होती. संबंधित महिलेने घर दाखविण्याचा बहाणा करून तक्रारदाराला आपल्या घरी बोलावले. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या तिच्या साथीदारांनी तक्रारदाराला मारहाण केली. त्यानंतर त्याचे आक्षेपार्ह फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि समाजात बदनामी करण्याची धमकी देत त्याच्याकडून खंडणी उकळली.

    आरोपींनी तक्रारदाराकडून 75 हजार रुपये रोख तसेच अंदाजे दोन तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या खंडणी म्हणून घेतल्या. एवढ्यावरच न थांबता तक्रारदाराच्या वाहनाचेही नुकसान केल्याचे तपासात उघड झाले आहे.
    Maharashtra TimesMumbai Local : CSMT फास्ट लोकलच्या लेडीज फर्स्ट क्लासमध्ये डाऊन मारण्यावरुन वाद, महिलेने सहप्रवाशांवर पेपर स्प्रे फवारल्याने गोंधळ
    या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस उपनिरीक्षक नीता दामधर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य महिला आरोपी रील्स स्टार शुभांगी हिवाळे हिला मंठा रोड परिसरातून ताब्यात घेतले.

    रीलस्टारने नावं उघड केली

    चौकशीत शुभांगी हिवाळे हिने आपल्या साथीदारांची नावे उघड केल्यानंतर पोलिसांनी राम राजू पाटोळे, आणि अनिकेत प्रशांत कसबे यांना अटक केली. तपासात अनिकेत कसबे हा वकिलीचे शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे.

    Vijay Wadettiwar | नागपुरातून विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

    आरोपींकडून तक्रारदाराच्या 2 सोन्याच्या अंगठ्या, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन, 2 दुचाकी आणि रोख रक्कम असा 3 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    बदनामीच्या भीतीने गप्प

    विशेष म्हणजे हा प्रकार 2 जून 2026 रोजी घडला होता. मात्र बदनामीच्या भीतीने तक्रारदाराने तातडीने पोलीस तक्रार दाखल केली नव्हती. काही दिवसांपूर्वी अशाच स्वरुपाच्या प्रकरणात सपना निकाळजे आणि तिच्या टोळीविरोधात चंदनझिरा पोलिसांनी कारवाई केल्यानंतर नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर तक्रारदाराने धाडस करून पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी कायदेशीर मार्गदर्शन व विश्वास दिल्यानंतर तक्रार नोंदविण्यात आली आणि अखेर या ब्लॅकमेल रॅकेटचा पर्दाफाश झाला.
    Maharashtra TimesCrime News : बाईक वळण घेताना मुद्दाम बॅग पाडली, 19 वर्षांच्या विवाहितेने प्रियकराच्या साथीने नवऱ्याचा काटा काढला, सीसीटीव्हीने भांडाफोड
    ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक नीता दामधर, पोहेकॉ कृष्णा तंगे, राजू पवार, अभिजित वायकोस, नवनाथ पाटील, सागर खैरे, महिला पोलीस ज्योती राजपूत तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ सागर बावस्कर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे,तसेच कोणाची काही तक्रार किंवा या टोळीने जर कुणाला फसवले असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा