• Thu. Sep 3rd, 2026

Pune BJP News: पुण्यातील भाजप नेता कुटुंबासह बाहेर, आरोपींनी डाव साधला; उच्चभ्रू सोसायटीत घुसत महागड्या गाड्या फोडल्या

पुणे : ​पुण्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या बी टी कवडे रस्ता भागातील निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांना काही अज्ञातांनी लक्ष्य केले आहे. अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दोन महागड्या गाड्यांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, एका बड्या नेत्याच्या घराबाहेरच असा प्रकार घडल्याने पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घोरपडी येथील बी. टी. कवडे रोड परिसरात असलेल्या ‘सिटाडेल एम्प्रेस’ या उच्चभ्रू सोसायटीमध्ये दिलीप कांबळे वास्तव्यास आहेत. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास कांबळे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत रात्री साधारण ८ ते ९ च्या दरम्यान हल्लेखोर सोसायटीच्या आवारात शिरले. त्यांनी कांबळे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन्ही चारचाकी गाड्यांवर दगड, लाठ्या आणि बांबूने जोरदार प्रहार केले. गाड्यांच्या काचा फोडून मोठे नुकसान करण्यात आले. रात्री जेव्हा कांबळे कुटुंबीय घरी परतले, तेव्हा घरासमोरील वाहनांची दुरावस्था पाहून त्यांना मोठा धक्का बसला.

​या संपूर्ण हल्ल्यामध्ये तोडफोड करणाऱ्यांनी कमालीची सावधगिरी बाळगल्याचे दिसून येत आहे. हल्लेखोरांनी वाहनांची तोडफोड करण्यापूर्वी पुरावे मागे राहू नये म्हणून घराच्या परिसरातील तीन महत्त्वाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर्स कापून टाकल्या होत्या. विशेष बाब म्हणजे, सोसायटीच्या पार्किंगमध्ये इतरही अनेक नागरिकांची वाहने उभी होती, मात्र हल्लेखोरांनी इतर कोणत्याही गाडीला साधा हातही लावला नाही. केवळ दिलीप कांबळे यांच्याच गाड्यांना टार्गेट करण्यात आले.

​घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून दिलीप कांबळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परिसरातील मुख्य रस्त्यांवरील कॅमेरे आणि सोसायटीच्या प्रवेशद्वारावरील फुटेज तपासून संशयितांचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

​या धक्कादायक प्रकारानंतर दिलीप कांबळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “गाड्या फोडणे हा निव्वळ वाहनांचे नुकसान करण्याचा प्रकार नसून, हा थेट माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबीयांवर केलेला सुनियोजित हल्ला आहे. सीसीटीव्ही तोडून केलेली ही कारवाई अत्यंत गंभीर असून यामागील सूत्रधारांना पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकाव्यात,” असं दिलीप कांबळे या हल्ल्यानंतर म्हणाले आहेत.

​दरम्यान, राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पुण्यात माजी मंत्र्याच्या घरावरच अशा प्रकारे हल्ला झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या घटनेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता असून, पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed